‘तक्रार केली म्हणून दबाव?’ जनार्दन मून यांची सीताबर्डी पोलिसांकडे धाव

– स्वाती बंगल्याच्या प्रकरणात मानहानीच्या नोटिशीची चौकशीची मागणी

The Exposer
नागपूर : सिव्हिल लाईन्स परिसरातील शासकीय स्वाती बंगला क्र. 64/1 व संलग्न शासकीय जागेबाबत तक्रार केल्यानंतर आपल्यावर वकिलामार्फत दबाव आणला जात असल्याचा आरोप करीत 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिक तथा माजी नगरसेवक जनार्दन गुलाबराव मून यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात नव्याने तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रार मागे घेण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव, मानसिक त्रास तसेच भविष्यात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करीत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मून यांनी दि. 21 ऑगस्ट 2026 रोजी स्वाती बंगला व संबंधित शासकीय जागेबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. माहितीच्या अधिकारातून प्राप्त कागदपत्रे, शासनाचा पत्रव्यवहार तसेच सन 2016 पासून उपलब्ध अभिलेखांच्या आधारे त्यांनी शासकीय मालमत्तेचा वापर, ताबा, Leave & License, Development Agreement, पुनर्विकास प्रक्रिया आणि संबंधित संस्था अथवा कंपनीच्या अधिकारांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

मून यांच्या म्हणण्यानुसार, या तक्रारीनंतर त्यांना दि. 20 सप्टेंबर 2026 रोजी वकिलामार्फत मानहानीच्या दाव्याची नोटीस प्राप्त झाली. सदर नोटीस हा संबंधितांचा स्वतंत्र कायदेशीर अधिकार आहे की पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, याबाबत आपल्याला निश्चित माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, तक्रारीनंतर नोटीस मिळाल्याने या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याची पोलिसांनी निष्पक्षपणे पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला का?’

मून यांनी संबंधित व्यक्तींकडून झालेला पत्रव्यवहार, दूरध्वनी, संदेश अथवा इतर संपर्काची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच तक्रार मागे घेण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव, धमकी, छळ अथवा बेकायदेशीर हस्तक्षेप झाला आहे का, याची वस्तुनिष्ठ तपासणी करण्याची विनंती केली आहे.

‘माझ्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्यास जबाबदारी निश्चित करा’

आपले वय 77 वर्षे असून, शासकीय मालमत्तेच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने तक्रार केल्यानंतर दबावाचे वातावरण निर्माण झाल्याची भावना असल्याचे मून यांनी अर्जात नमूद केले आहे. भविष्यात धमकी, दबाव, खोटी तक्रार अथवा खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचीही स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आवश्यक असल्यास कायद्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची विनंतीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

जातीय दबाव आढळल्यास कठोर कारवाईची मागणी

आपण अनुसूचित जातीचे नागरिक असल्याचे नमूद करत, जातीय ओळखीचा आधार घेऊन दबाव, धमकी किंवा अपमान करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 तसेच भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

स्वाती बंगल्याच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी

स्वाती बंगला क्र. 64/1 संदर्भातील शासकीय अभिलेख, 2016 पासूनचा शासनाचा पत्रव्यवहार, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट/पत्रकार क्लबशी संबंधित कागदपत्रे, Leave & License Agreement, Development Agreement, पुनर्विकास व बांधकाम परवानग्या, शासन व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मंजुरी, संबंधित संस्था किंवा कंपनीची नोंदणी व अधिकार तसेच शासकीय जागेचा वापर, ताबा आणि हस्तांतरणाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी मून यांनी केली आहे.

तसेच, उपलब्ध कागदपत्रे बदलली, नष्ट केली किंवा त्यात फेरफार होण्याची शक्यता असल्यास संबंधित पुरावे सुरक्षित करून कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.

“उपलब्ध माहितीच्या अधिकारातील कागदपत्रांच्या आधारे कायदेशीर मार्गाने प्रश्न उपस्थित करणे हा माझा अधिकार आहे. त्यामुळे तक्रार केल्याबद्दल माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये आणि माझ्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात यावी,” अशी भूमिका मून यांनी तक्रारीत मांडली आहे. या तक्रारीवर सीताबर्डी पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, तसेच स्वाती बंगला व संबंधित शासकीय जागेबाबतच्या कागदपत्रांची चौकशी कोणत्या दिशेने पुढे जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More