– ‘कंपनीत काम देतो’चे आमिष दाखवून कुटुंबाला फसवले; बाथरूमच्या बहाण्याने चिमुकल्याला घेऊन पोबारा
The Exposer
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावरून सहा वर्षांच्या बालकाचे अपहरण करून पसार झालेल्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उत्तर प्रदेशातील मिर्झापूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज, रेल्वे मार्गावरील तपास आणि तातडीच्या पोलिस कारवाईच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. अपहृत बालकाचीही सुखरूप सुटका करण्यात आली.
रेल्वे पोलिसांच्या प्रेस नोटनुसार, राजस्थानातील पाली जिल्ह्यातील भंवरलाल रताराम चौहान (वय ३८) हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना दिलीप (१३), राकेश (८) आणि करण (६) अशी तीन मुले आहेत. कामाच्या शोधात ते हैदराबाद येथे गेले होते. तेथून राजस्थानला परतण्यासाठी ते मुलांसह सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर आले होते.
याचदरम्यान ‘करण’ नावाच्या अनोळखी व्यक्तीने चौहान यांच्याशी ओळख वाढवली. ‘माझी कंपनी आहे, तुम्हाला कंपनीत काम देतो,’ असे आमिष दाखवून त्याने त्यांना सोबत येण्यास सांगितले. त्यानंतर सिकंदराबाद ते दानापूर रेल्वेचे तिकीट काढून तो कुटुंबासोबत प्रवास करू लागला. रेल्वे नागपूर स्थानकावर आल्यानंतर रात्री येथेच थांबून दुसऱ्या दिवशी बसने कंपनीत जाण्याचे सांगण्यात आले.

रात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने चौहान व त्यांच्या मुलांना जेवण दिले. त्यानंतर चौहान मुलांसाठी औषध आणण्यासाठी स्थानकाबाहेर गेले. याच संधीचा फायदा घेत आरोपीने सहा वर्षांच्या करणला ‘बाथरूमला घेऊन जातो’ असे सांगून सोबत नेले आणि पुन्हा परतलाच नाही. या घटनेनंतर २१ सप्टेंबर २०२६ रोजी चौहान यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाणे नागपूर येथे गुन्हा क्रमांक ६३५/२०२६, कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीने उघड केला आरोपीचा मार्ग
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांनी तपास स्वतःकडे घेतला. नागपूर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी बालकाला घेऊन अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसमध्ये बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी पथके रवाना करण्यात आली.
आरोपी बिहारी भाषेत बोलत असल्याची माहिती
मिळाल्यानंतर तो बिहारच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेने प्रवास करत असण्याचा संशय पोलिसांना आला. आरोपी आणि बालकाचे फोटो संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले. तसेच पोलिसांचे एक पथक पाठलागासाठी रवाना करण्यात आले.

पोलिसांच्या पथकाने अखेर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर रेल्वे स्थानक गाठून अपहृत करण आणि आरोपीला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव मिथुनकुमार दयाचंद्र पासवान (वय २१, व्यवसाय मजुरी, रा. काशोचक, पोस्ट मुरौडा, थाना बिहार शरीफ, जि. नालंदा, बिहार) असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला व बालकाला नागपूरला आणून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, बालकाचे अपहरण मानव तस्करी अथवा अन्य कोणत्या कारणासाठी करण्यात आले होते का, याचा पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईत लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक संदीप इंगळे, पोलिस हवालदार पुष्पराज मिश्रा, पोलिस हवालदार चंद्रशेखर येळेकर, पोलिस हवालदार भूपेश धोंगडी, पोलिस शिपाई मजहर अली, अमित त्रिवेदी, रोशन मोगरे या लोहमार्ग पोलिस पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Author: संतोष तायडे
संपादक















