भंडाऱ्यात पेट्रोलपंप लुटला, नागपुरात सोन्याची चैन हिसकावली; सीताबर्डी पोलिसांनी दोघांना केले जेरबंद!

– CCTV आणि तांत्रिक तपासातून आरोपींचा पर्दाफाश, ₹२.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : भंडारा येथील पेट्रोलपंपावर चोरी केल्यानंतर नागपुरात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पसार झालेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात सीताबर्डी पोलिसांना यश आले आहे. CCTV फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ₹२ लाख ५४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपींचा सीताबर्डीतील घरफोडी आणि भंडारा येथील पेट्रोलपंप चोरीशीही संबंध असल्याचे समोर आले आहे.

भंडाऱ्यात पेट्रोलपंपावर चोरी; नागपुरात चैन हिसकावली

सीताबर्डी पोलिसांच्या तपासात आरोपींनी भंडारा येथील पेट्रोलपंपावर चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नागपुरातही चोरीच्या घटनांना हात घातल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या टोळीच्या आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ५९२/२०२६ मध्ये १६ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता एस. जयलक्ष्मी (वय ६८) या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सजवळून आकाशवाणी चौकाच्या दिशेने पायी जात होत्या.

पत्ता विचारण्याचा बहाणा अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास

बँक ऑफ इंडियासमोर पांढऱ्या रंगाची कार त्यांच्या जवळ थांबली. कारमध्ये तीन इसम होते. त्यापैकी एकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी संवाद साधला. संधी साधून आरोपीने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची, अंदाजे ₹१ लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावली आणि साथीदारांसह पसार झाला. घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.

CCTV, तांत्रिक तपासाने आरोपी जाळ्यात

तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख शाहरुख शेख कलीम (वय अंदाजे ३०, रा. न्यू म्हाडा, उप्पलवाडी, कामठी रोड, कपिलनगर, नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा साथीदार उस्मान अकबर खान (वय अंदाजे ३५, रा. न्यू म्हाडा, उप्पलवाडी, कामठी रोड, कपिलनगर, नागपूर) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

घरफोडीसह पेट्रोलपंप चोरीची कबुली

पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तपासादरम्यान आरोपींनी सीताबर्डी परिसरातील घरफोडी तसेच भंडारा येथील पेट्रोलपंपावर चोरी केल्याची कबुली दिली आहे. संबंधित गुन्ह्यांबाबत पुढील तपास सुरू आहे. आरोपींकडून पोलिसांनी १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, मोबाईल फोन, रोख रक्कम, बँक पासबुक, एटीएम कार्ड, इतर साहित्य, असा एकूण ₹२ लाख ५४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनिता साहू, पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीलसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनिष कोल्हटकर, पोउपनि. शाम वारंगे, पोहेवा. नंदकिशोर वाळदे, पोशि. शशिकांत मुंडे, पोशि. प्रशांत भोयर, पोशि. चेतन शेंडे, पोशि. नैनेश तलवारे आणि पोशि. सचिन भोयर यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More