– उच्च शिक्षण विभागाच्या दप्तरदिरंगाईविरोधात नागपुरात धरणे; २३ मागण्यांचे निवेदन सादर
The Exposer
नागपूर : राज्यातील तासिका प्राध्यापकांचे मानधन वेळेवर अदा न झाल्याने उच्च शिक्षण विभागाच्या प्रशासकीय दप्तरदिरंगाईविरोधात नागपुरात तीव्र आंदोलन करण्यात आले. जूनपासून सेवेत रुजू झालेल्या अनेक तासिका प्राध्यापकांना चार महिने उलटूनही मानधन मिळाले नसल्याचा आरोप प्राध्यापक पदभरती महासंघाने केला आहे. या प्रश्नाकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटना, नागपूर संलग्नित प्राध्यापक पदभरती महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अध्यक्ष डॉ. प्रमोद लेंडे खैरगावकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील तासिका प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दरमहा वेतनाची मागणी
राज्य सरकारच्या १४ नोव्हेंबर २०१८ आणि १७ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासननिर्णयानुसार तासिका प्राध्यापकांना दरमहा सेवार्थ प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात वेतन देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने प्राध्यापकांना चार ते सहा महिने मानधनाच्या प्रतीक्षेत राहावे लागत असल्याचा आरोप महासंघाने केला. तासिका पद्धतीऐवजी ११ महिन्यांच्या सेवाकाळासह सेवापुस्तिका देऊन ‘कार्यकारी सहाय्यक प्राध्यापक’ अशी व्यवस्था निर्माण करावी, तसेच समान कामासाठी समान वेतनाचा निर्णय लागू करावा, अशीही प्रमुख मागणी करण्यात आली.
१२०० रुपये प्रति तास मानधनाच्या घोषणेची अंमलबजावणी कधी?

यंदाच्या पावसाळी अधिवेशनात उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तासिका प्राध्यापकांना एका तासिकेसाठी १२०० रुपये मानधन देण्याची घोषणा केल्याचा दावा महासंघाने केला आहे. या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करून जूनपासूनचे वाढीव मानधनही देण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
प्राध्यापक भरतीतील रिक्त पदांचा मुद्दाही ऐरणीवर
राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठांमधील ६०० प्राध्यापकांची पदे आणि महाविद्यालयांमधील ५,०१२ रिक्त पदांच्या भरतीचा प्रश्नही आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला. सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्यासाठी UPSCच्या धर्तीवर स्वतंत्र प्राध्यापक पदभरती आयोग स्थापन करण्याची मागणी महासंघाने केली. वर्षानुवर्षे तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या नेट, सेट आणि पीएच.डी. पात्र प्राध्यापकांच्या सेवेला स्थैर्य मिळावे, अशी मागणीही करण्यात आली.
२३ मागण्यांचे निवेदन
तासिका प्राध्यापकांचे नियमित व वेळेवर मानधन, ११ महिन्यांचा सेवाकाळ, सेवापुस्तिका, समान काम समान वेतन, वाढीव मानधनाची अंमलबजावणी आणि प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती यांसह एकूण २३ मागण्यांचे निवेदन उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद लेंडे खैरगावकर यांनी सरकारकडे अनेक वेळा निवेदने व आंदोलने करूनही प्रश्न कायम असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक अडचणींमुळे राज्यातील काही तासिका प्राध्यापकांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा करण्यात आला असून, अशा कुटुंबांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनात मोर्चाचा इशारा
तासिका प्राध्यापकांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान मोठ्या आंदोलनाचा इशारा महासंघाने दिला. “वर्षानुवर्षे तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या पात्र प्राध्यापकांना आर्थिक आणि सेवाविषयक स्थैर्य मिळाले पाहिजे,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
या आंदोलनात डॉ. प्रमोद लेंडे खैरगावकर, डॉ. रोषण भगत, प्रा. मालविका क्षीरसागर, डॉ. लखन इंगळे, प्रा. योगिता मानमोडे, डॉ. माधुरी बोटरे, डॉ. सना कौसर, प्रा. तरन्नुम खान, प्रा. रवी गुंडे, प्रा. अमित भुसारे, प्रा. प्रियांका मेश्राम, डॉ. प्रगती हरडे, डॉ. ज्वाला डहाट, प्रा. कविता तडोसे आणि प्रा. संदेश सहारे यांच्यासह अनेक तासिका प्राध्यापक सहभागी झाले.
Author: संतोष तायडे
संपादक















