खाकीवरील विश्वासाला तडा! विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप

– वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावले; गर्भवती झाल्यानंतर १७ वर्षीय विद्यार्थिनीने उघड केला प्रकार

The Exposer
नागपूर : नागपुरात खाकी वर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर घटना समोर आली आहे. पोलिस दलातील क्युआरटी विभागात कार्यरत असलेल्या २५ वर्षीय कर्मचाऱ्यावर बारावीच्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थिनी गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी प्रतीक विनोद धरपाल याची विद्यार्थिनीसोबत २०२२ मध्ये इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती. सोशल मीडियावरील संवादाचे रूपांतर मोबाईल आणि व्हॉट्सअॅपवरील संपर्कात झाले. पुढे दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. पोलिस कर्मचारी असल्याने विद्यार्थिनीचा त्याच्यावर विश्वास बसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

वाढदिवसाचे निमित्त अन् घरात बोलावले

१७ ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याचे सांगून आरोपीने विद्यार्थिनीला महेशनगर येथील घरी बोलावल्याचा आरोप आहे. घरात कोणी नसताना त्याने तिच्यावर शारीरिक संबंधासाठी दबाव आणला. विद्यार्थिनीने विरोध केल्यानंतर धमकी व दमदाटी करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. घटनेनंतर भीतीपोटी विद्यार्थिनीने बराच काळ मौन बाळगले. आरोपी स्वतः पोलिस दलात कार्यरत असल्याने तक्रार करूनही आपल्याला न्याय मिळेल की नाही, अशी भीती तिच्या मनात असल्याचे तक्रारीतून समोर आले आहे.

कॉलेजमध्ये चक्कर आली आणि गुपित उघड झाले

२२ सप्टेंबर रोजी कॉलेजमध्ये वर्ग सुरू असताना विद्यार्थिनीला अचानक चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. शिक्षकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी पालकांना सांगितले. ही माहिती समोर आल्यानंतर पालकांनी विद्यार्थिनीशी संवाद साधला. त्यावेळी तिने आरोपी पोलिस कर्मचाऱ्याने घरी बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. त्यानंतर पालकांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर गिट्टीखदान पोलिसांनी प्रतीक धरपाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More