समाजसेवेचा आधारवड हरपला!, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघटनेचे संस्थापक योगेश वागदे यांचे निधन

– सामाजिक, राजकीय व सेवाभावी क्षेत्रावर शोककळा; आज मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार

The Exposer 
नागपूर : सामाजिक, राजकीय आणि सेवाभावी क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे, महाराष्ट्र शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघटनेचे महाराष्ट्रातील संस्थापक आणि नागपूरचे वर्तमान अध्यक्ष योगेश वागदे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सामाजिक, राजकीय आणि सेवाभावी क्षेत्रात शोककळा पसरली.

योगेश वागदे यांनी समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य केले. सेवाभावी वृत्ती, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी त्यांनी दिलेले योगदान त्यांच्या कार्याची विशेष ओळख ठरले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 3 च्या सुमारास कॅपिटल हाईट्स, मेडिकल रोड, उंटखाना समोर, व्ही.आर. मॉलजवळ, नागपूर येथील निवासस्थानावरून निघून मोक्षधाम घाट, घाट रोड, नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

योगेश वागदे यांच्या निधनामुळे सामाजिक आणि सेवाभावी चळवळीतील एक कार्यशील व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सहकारी, पदाधिकारी आणि मित्रपरिवारातून व्यक्त होत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि योगदानाची आठवण कायम राहील, अशा भावना व्यक्त करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघटनेच्या वतीने डॉ. राजाभाऊ टाकसाळे, भूषण दडवे, रामगोविंद खोब्रागडे, प्रकाश कुंभे, डॉ. विजय नीलावार, आर. आर. मुन, पृथ्वीराज चव्हाण, अशोक बागडे, प्रकाश चव्हाण, रमेश वैद्य यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More