संविधानाच्या रक्षणासाठी रिपब्लिकन चळवळ अधिक तीव्र करण्याचा निर्धार!

– RPI वर्धापन दिनानिमित्त संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; सामाजिक न्यायासाठी संघर्षाची हाक

The Exposer
नागपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)च्या वर्धापन दिनानिमित्त संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधानिक मूल्यांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी रिपब्लिकन चळवळ अधिक आक्रमक व व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याला अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला RPIचे नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी कुंभे, नागपूर शहर कार्याध्यक्ष क्षितिज गायकवाड, शहर महासचिव रजत महेशगवळी, साहेबराव भालेराव, डॉ. मोहन वानखेडे, ज्ञानदीप कुमार, अमन खरे, धम्मरक्षित मेश्राम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी रिपब्लिकन चळवळीला अधिक बळकटी देण्याची गरज व्यक्त केली. समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठीचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचे आवाहनही करण्यात आले.

“जय भीम” आणि “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिंदाबाद” अशा घोषणांनी संविधान चौक परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन चळवळीप्रती आपली बांधिलकी व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.

सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचा लढा अधिक व्यापक करत संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी रिपब्लिकन चळवळ संघटित करण्याचा निर्धार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More