संविधान चौकाची जागा गिळंकृत करू नका!

– विधानभवन विस्ताराच्या प्रस्तावाविरोधात यशवंत तेलंग यांच्या नेतृत्वात जनआंदोलन; नारेबाजी, निदर्शने आणि शासनाला निवेदन

The Exposer
नागपूर : शहराच्या लोकशाही आंदोलनांची ओळख असलेल्या संविधान चौकाच्या अस्तित्वावर परिणाम करणारे नियोजन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बॅ. राजाभाऊ खोब्रागडे)चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत तेलंग यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकात जनआंदोलन करण्यात आले. विधानभवनाच्या विस्तारीकरणासाठी संविधान चौक परिसरातील जागेवर परिणाम करण्याऐवजी नवीन जागेवर विधानभवनाचा विस्तार करावा आणि संविधान चौकातील आंदोलनस्थळ कायम ठेवावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत निदर्शने केली. यानंतर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित शासकीय यंत्रणांना निवेदन देण्यात आले.

‘विकास हवा; पण आंदोलनाची जागा हिरावून नको!’

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, विधानभवनाला लागून असलेली त्रिकोणी जागा आणि विद्यमान विधानभवनाच्या जागेदरम्यान विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेला रस्ता विधानभवनाच्या विस्तारीकरणासाठी बंद करण्याचा प्रस्ताव आहे. हा रस्ता बंद झाल्यास भविष्यात संविधान चौक परिसरातील उपलब्ध जागेवर परिणाम होण्याची शक्यता असून, आंदोलने, उपोषणे, निषेध मोर्चे आणि सत्याग्रह सभा यांच्यासाठीची जागा कमी होऊ शकते, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

त्यामुळे विकासकामांच्या नियोजनात संविधान चौकाच्या ऐतिहासिक आणि लोकशाही महत्त्वाचा विचार करून कोणताही निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

‘संविधान चौक केवळ चौक नाही; आंदोलनांची ऐतिहासिक भूमी’

नागपूरमधील विविध सामाजिक, राजकीय आणि जनआंदोलनांचे संविधान चौक हे प्रमुख केंद्र राहिले आहे. नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि आंदोलक याच ठिकाणी आंदोलन करतात. त्यामुळे विकासाच्या नावाखाली या परिसरातील आंदोलनाची जागा कमी होऊ नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

विधानभवन विस्तारासाठी उपलब्ध जागेवर मर्यादा निर्माण करणाऱ्या नियोजनाऐवजी संपूर्ण परिसराचा स्वतंत्र आणि एकात्मिक विकास आराखडा तयार करून तो जनतेसमोर मांडावा, अशी मागणीही करण्यात आली.

‘जागा कमी करण्याचा डाव’ असल्याचा आंदोलकांचा आरोप

संविधान चौकाच्या उपलब्ध जागेवर परिणाम होईल अशा पद्धतीने नियोजन करणे म्हणजे लोकशाही आंदोलनासाठीची जागा कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मात्र, या आरोपांबाबत संबंधित शासकीय यंत्रणांची अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही. आंदोलनानंतर यशवंत तेलंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, नागपूर यांना निवेदन सादर केले.

आंदोलनात राष्ट्रीय महासचिव वीरेंद्र दहीकर, महाराष्ट्र अध्यक्ष संदीपसिंग अग्रवाल, महाराष्ट्र महासचिव केवलदास टेंभेकर यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More