मासिक पाळी शाप नसून ‘वरदान’

कतारी समुदायातील महिला व तरुणींसाठी ‘Menstruation Health and Hygiene’ जनजागृती कार्यक्रम

The Exposer

नागपूर : मासिक पाळीविषयीच्या अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. यासाठी वजह फाउंडेशन, नागपूर यांच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी कतारी समुदाय, टेलिफोन एक्सचेंज चौक येथे महिला व तरुणींमध्ये मासिक पाळीचे आरोग्य, स्वच्छता आणि त्याबाबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने ‘Menstruation Health and Hygiene’ या विषयावर जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या संसाधन व्यक्ती व प्रमुख वक्त्या कु. तृप्ती देशकर यांनी उपस्थित महिला व तरुणींना मासिक पाळीशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर व शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन केले. यामध्ये स्त्रीच्या प्रजनन संस्थेची रचना व कार्ये चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आली. स्त्रीच्या शरीररचनेबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी शारीरिक रचना व विविध मार्गांची माहिती सोप्या भाषेत देण्यात आली.

मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध साधनांचीही माहिती देण्यात आली. यामध्ये सॅनिटरी पॅड, One-time-use/Reusable Period Panty, Menstrual Cup आणि Tampon यांचा समावेश असून, त्यांचा योग्य वापर, स्वच्छता आणि आवश्यक काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.मासिक पाळीविषयी समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा, रूढी आणि गैरसमजांवर विशेष चर्चा करण्यात आली. “मासिक पाळी हा आजार नाही; मात्र मासिक पाळीच्या काळात योग्य स्वच्छता व आरोग्यविषयक काळजी न घेतल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात,” हे उपस्थितांना स्पष्ट करण्यात आले.

मासिक पाळीतील रक्ताबाबत समाजात असलेला नकारात्मक दृष्टिकोन दूर करण्यासाठी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. “डोक्यातून रक्त वाहिले तर आपण त्याला आजार किंवा अशुद्धता मानत नाही, मग मासिक पाळीच्या काळात बाहेर पडणाऱ्या रक्ताकडे वेगळ्या नजरेने का पाहावे?” या उदाहरणातून मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील नैसर्गिक जैविक प्रक्रिया असल्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करण्यात आला.
कार्यक्रमात संवादात्मक पद्धतीने विविध उपक्रम व प्रश्नोत्तरांचे आयोजन करण्यात आले. उपस्थित महिला व तरुणींनी मासिक पाळी, स्वच्छता, शरीररचना, मासिक पाळीदरम्यान वापरली जाणारी साधने, तसेच अंधश्रद्धा व गैरसमज याबाबत विविध प्रश्न विचारले. संसाधन व्यक्तीने त्यांच्या प्रश्नांचे शास्त्रीय पद्धतीने निरसन केले.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला व तरुणींमध्ये मासिक पाळीच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, वैयक्तिक स्वच्छतेच्या योग्य सवयी विकसित करणे आणि मासिक पाळीशी संबंधित सामाजिक गैरसमज व अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा होता. कार्यक्रमाच्या शेवटी सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वजह फाउंडेशन, नागपूरचे संचालक प्रो. डॉ. केशव वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयक लोकेश सोनोने यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी पार पाडली. क्षेत्रकार्य पर्यवेक्षिका अनुराधा ताई कोठार तसेच क्षेत्रकार्य विद्यार्थी प्रतीक्षा खंडारे, ममता भांडेकर आणि आचल धुमने यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
महिलांच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर समाजामध्ये खुलेपणाने चर्चा होणे, योग्य माहिती पोहोचणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती होणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

प्रमोद गणवीर
Author: प्रमोद गणवीर

पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर

Leave a Comment

Read More