– लकडगंज पोलिसांच्या ‘शास्त्रीय तपासा’ला न्यायालयीन दोषसिद्धीचे यश
– CCTV, तांत्रिक व वैज्ञानिक पुराव्यांनी गुन्हेगाराला न्यायालयात केले निष्प्रभ
The Exposer
नागपूर : नागपूर शहरासह विविध जिल्ह्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या कुख्यात सराईत आरोपी नरेश अंकालू महिलांगे (वय ३४) याला नागपूरच्या मा. DJ-2 न्यायालयाने ६ वर्षे कारावास आणि ₹२०,००० दंडाची शिक्षा सुनावली आहे. सेशन केस क्र. 6477/2021 मधील या दोषसिद्धीमुळे लकडगंज पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. पोलीस ठाणे लकडगंज येथे दाखल अपराध क्र. 15/2021 मधील कलम 380, 457, 411, 413, 414, 34 भादंवि अंतर्गत प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली.
सराईत घरफोड्याचा मोठा गुन्हेगारी इतिहास
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नरेश महिलांगे हा घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सराईत असून त्याच्याविरुद्ध नागपूर शहर, नागपूर ग्रामीण तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मोठ्या संख्येने गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी MCOCA, तडीपार आणि MPDA अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ यांसह विविध जिल्ह्यांमध्येही आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे तपासातून समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये तो संबंधित पोलिसांना पाहिजे असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. आरोपीविरुद्ध शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांचीही नोंद असल्याचे सांगण्यात आले.
बंद घरांवर नजर; रात्रीच्या वेळी घरफोडी
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीची कार्यपद्धती ठरलेली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो स्वतःच्या पत्त्यावर न राहता दुसऱ्या जिल्ह्यात अथवा राज्यात जाऊन वास्तव्य करीत असे. रात्रीच्या वेळी बंद घरांची पाहणी करून संधी साधत घरफोडी करणे, रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू लंपास करणे आणि त्यानंतर पोलिसांची नजर चुकविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पसार होणे, अशी त्याची पद्धत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
CCTV ते वैज्ञानिक पुरावे; लकडगंज पोलिसांचा अचूक तपास
या प्रकरणाच्या तपासामध्ये CCTV फुटेजचे सूक्ष्म विश्लेषण, तांत्रिक पुरावे, C.A. रिपोर्ट तसेच इतर वैज्ञानिक व पूरक पुराव्यांचा प्रभावी वापर करण्यात आला. तपास पथकाने साक्षीदारांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्यायालयासमक्ष हजर केले. विविध पुराव्यांची योग्य सांगड घालत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र व आवश्यक पुरावे न्यायालयात प्रभावीपणे सादर करण्यात आले.
सरकारी पक्षाच्या प्रभावी युक्तिवादाला यश
सदर प्रकरणात सरकारी अभियोक्ता ॲड. साई खेडकर यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. तपास यंत्रणेने सादर केलेले CCTV, तांत्रिक, वैज्ञानिक व साक्षीदारांचे पुरावे तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत मा. न्यायालयाने आरोपीला दोषसिद्ध ठरविले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सराईत गुन्हेगारांविरुद्ध ठोस पुरावे उभे करून दोषसिद्धी मिळविण्याच्या लकडगंज पोलिसांच्या तपास पद्धतीला बळ मिळाले आहे.
या अधिकाऱ्यांनी बजावली महत्त्वपूर्ण भूमिका
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हवालदार अमर काळे, नितीन सातपुते, पंकज दहापुते, शैलेंद्र चौधरी, पोलीस अंमलदार सुशीला धुर्वे, कार्तिक मडगुलवार, आनंद मर्सकोल्हे, मयूर बनसोडे तसेच सरकारी अभियोक्ता ॲड. साई खेडकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Author: संतोष तायडे
संपादक















