नागपूर रेल्वे स्थानकावर सापडले गौसेवक राजूभाई पंड्या

– रायपूरला जाणाऱ्या ट्रेनची करत होते प्रतीक्षा; लकडगंज पोलिसांनी घेतले सुरक्षित ताब्यात

The Exposer 
नागपूर : कामधेनू गौशाळेचे संचालक गौसेवक राजूभाई पंड्या यांच्या रहस्यमय बेपत्ता होण्याचा अखेर गुरुवारी रात्री उलगडा झाला. गुप्त माहितीच्या आधारे लकडगंज पोलिसांनी रात्री साडेनऊच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावरून राजूभाई पंड्या यांचा शोध घेतला. ते रायपूरला जाण्याच्या तयारीत असून रेल्वेची प्रतीक्षा करत असल्याचे समोर आले.

लकडगंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री राजूभाई पंड्या नागपूर रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने रेल्वे स्थानकावर पोहोचले. राजूभाई यांची ओळख पटताच पोलिसांनी त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.

चार राज्यांमध्ये शोधमोहीम

राजूभाई यांच्या बेपत्ता होण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली होती. त्यांच्या छायाचित्रांसह बेपत्ता असल्याचे पोस्टर चार राज्यांतील पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके, बसस्थानके, धार्मिक स्थळे, लॉज आणि हॉटेल परिसरात लावण्यात आले होते.

शोधमोहीमेदरम्यान बुधवारी पोलिसांची दोन पथके भंडारा आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथेही रवाना करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील लक्ष ठेवून होते. लकडगंज पोलिसांचे पथकही संभाव्य ठिकाणी सातत्याने शोध घेत होते.

राजूभाई पंड्या अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. माध्यमांमध्ये या प्रकरणाला सातत्याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली. अखेर गुरुवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर राजूभाई सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. राजूभाई रेल्वे स्थानकापर्यंत कसे पोहोचले? ते रायपूरला का जात होते? यासह त्यांच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण काय, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

गौसेवकांची लकडगंज पोलीस ठाण्यात गर्दिवस राजूभाई पंड्या सापडल्याची माहिती मिळताच आमदार कृष्णाजी खोपडे, राकेश अग्रवाल, मनोजभाई ठक्कर, हितेश जोशी, प्रवीण पांडे महाराज, शिवांशिव महाराज, यांच्यासह अनेक गौसेवक लकडगंज पोलीस ठाण्यात पोहोचले. राजूभाई सुरक्षित सापडल्याने त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुसरीकडे राजूभाई पंड्या यांच्या शोधासाठी लकडगंज पोलिस व शहर पोलिसांनी अथक परिश्रम घेतले, हे विशेष.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More