हुक्का पार्लरवर अमली पदार्थविरोधी पथकाचा छापा!

– ‘द फ्युजन कॅफे’मधून ₹३२,५०५ चा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध कारवाई

The Exposer
नागपूर : शहरातील धरमपेठ परिसरात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकून कारवाई केली. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेस्ट हायकोर्ट रोड, शंकर नगर चौक परिसरातील ‘द फ्युजन कॅफे’मध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट, इतर संबंधित साहित्य आणि रोख रकमेसह एकूण ३२ हजार ५०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पुरविताना आढळल्याचा पोलिसांचा दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ ते १०.३० वाजेदरम्यान अमली पदार्थविरोधी पथकाने ‘द फ्युजन कॅफे’ येथे कारवाई केली. यावेळी कॅफेमध्ये ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पुरविले जात असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी संबंधित साहित्य जप्त केले.

दोन आरोपींविरुद्ध कारवाई

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली आहे. यामध्ये विक्रांत भागवत शिंदे (वय २७), रा. राय टाऊन-२, इसासनी, शुभम सुनील वैद्य (वय २४), रा. जुनी वस्ती, खांबाळा, सम्यक बुद्ध विहाराजवळ, राणा प्रतापनगरयां दोघांचा समावेश आहे. या प्रकरणी कोटपा कायद्यासह महाराष्ट्र पोलीस कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील नमूद तरतुदींनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कॅफेच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन?

शहरातील कॅफे आणि हुक्का पार्लरमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा वापर किंवा पुरवठा होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होईल. ही कारवाई गुन्हे शाखा, अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील पोलिस पथकाने केली.

— The Exposer | Depth, Truth & Impact

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More