दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर मेट्रो सज्ज ! पहाटे ५ ते मध्यरात्री १२ पर्यंत सेवा

नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महा मेट्रोने मेट्रो सेवेच्या वेळेत वाढ
The Exposer

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमी (दसरा) निमित्त नागपुरात येणाऱ्या अनुयायायी आणि नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महा मेट्रोने मेट्रो सेवेच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर मेट्रोची सेवा पहाटे ५ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

चारही टर्मिनल स्थानकांवरून पहिली मेट्रो पहाटे ५ वाजता
२० ऑक्टोबर रोजी खापरी, ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर आणि लोकमान्य नगर या चारही टर्मिनल स्थानकांवरून पहिली मेट्रो ट्रेन पहाटे ५ वाजता सुटेल, तर शेवटची मेट्रो ट्रेन मध्यरात्री १२ वाजता सुटणार आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमीनिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महा मेट्रोने २०२३ पासून सलग तीन वर्षे अशा महत्त्वाच्या प्रसंगी नियमित वेळेपेक्षा अधिक काळ मेट्रो सेवा उपलब्ध करून दिली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरसह लगतच्या परिसरांतून, राज्यातील विविध जिल्ह्यांतून तसेच इतर राज्यांतून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. दुसरीकडे, विजयादशमीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणारे रावणदहनाचे कार्यक्रम पाहण्यासाठीही नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात.
या दोन्ही महत्त्वाच्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन महा मेट्रोने २० ऑक्टोबर रोजी मेट्रो सेवेची वेळ वाढवली आहे. त्यामुळे भाविक आणि नागरिकांना रात्री उशिरापर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार असून, रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.

प्रमोद गणवीर
Author: प्रमोद गणवीर

पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर

Leave a Comment

Read More