जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सुविधांची पाहणी ;अनुयायांसाठी निवारा, आरोग्य व सुरक्षेच्या चोख व्यवस्था
The Exposer
नागपूर : दीक्षाभूमी येथे आयोजित 70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनुयायांसाठी उभारण्यात येणारे निवारा डोम, आरोग्य सुविधा आणि अन्य नागरी सुविधांच्या तयारीची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक मार्गदर्शक सूचना देत कोणत्याही मूलभूत सुविधेत त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलींद मेश्राम, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दीक्षाभूमी परिसरात अनुयायांच्या निवासासाठी उभारण्यात येत असलेल्या डोमची तसेच अन्य व्यवस्थांची माहिती सुकेशिनी तेलगोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. याठिकाणी महिलांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्यात येत असून, एका डोममध्ये सुमारे 500 अनुयायांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अनुयायाला सुरक्षित, स्वच्छ आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने तयारीला अंतिम स्वरूप दिले आहे. सोहळ्याच्या काळात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
24 तास पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नियंत्रण कक्ष
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनुयायांसाठी निवाऱ्याची व्यवस्था, २४ तास पाणीपुरवठा, दिवसरात्र स्वच्छता आणि मार्गदर्शनासाठी नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात येत आहे. रविवार, १८ ऑक्टोबरपासून या सुविधा अनुयायांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सोहळ्याच्या मुख्य दिवशी तसेच अन्य दिवशी दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, निवास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
1 हजार 235 हून अधिक स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था
अनुयायांच्या सोयीसाठी महिला आणि पुरुषांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. आयटीआय परिसर, आरोग्य उपसंचालक कार्यालय (माता कचेरी) आणि कारागृहाच्या जागेत मिळून 1 हजार 235 हून अधिक स्वच्छतातागृहे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज
सोहळ्यादरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकांच्या व्यवस्थेचेही नियोजन करण्यात आले आहे. निवारा केंद्रांमध्ये अग्निशमन विभागामार्फत आग विझविण्याची व्यवस्था करण्यात आली असून, अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Author: प्रमोद गणवीर
पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर















