समोर चिल्लर देशी दारूचे दुकान, बाजूला सरकारी शाळा!

– नवीन इमारत तयार, तरीही विद्यार्थी भाड्याच्या इमारतीत घेत आहेत शिक्षण; २.९१ कोटींचा खर्च वाया?

The Exposer
नागपूर : महानगरपालिकेने भव्य शाळेची इमारत उभारली, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आणि विद्यार्थ्यांसाठी उत्तम वर्गखोल्याही बांधल्या. मात्र, ज्या इमारतीत मुलांचे भविष्य घडायला हवे, त्या इमारतीत आज धूळ साचत आहे. ज्या पटांगणात विद्यार्थ्यांचा किलबिलाट आणि खेळ सुरू व्हायला हवेत, तिथे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली शाळेची इमारत तयार असूनही विद्यार्थ्यांना भाड्याच्या इमारतीतच शिक्षण घ्यावे लागत आहे.

महानगरपालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. शाळा सुरू करायचीच नव्हती, तर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या इमारतीचा उपयोग नेमका कोणासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आशीनगर झोनमधील पंचशील नगर येथे पूर्वी राणी दुर्गावती प्राथमिक शाळा होती. कालांतराने मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शाळांवर संकट ओढवल्याने या शाळाही बंद करण्यात आल्या. त्यानंतर तत्कालीन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या कार्यकाळात विधानसभा मतदारसंघनिहाय आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून केजी-१ पासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली. मात्र, शाळेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने इंग्रजी माध्यमाची शाळा वैशालीनगर येथील भाड्याच्या इमारतीत भरविण्यात येऊ लागली.

सध्या महानगरपालिकेच्या नऊ इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू असून, त्यामधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैशालीनगर येथील भाड्याच्या इमारतीत आजही चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, या शाळेसाठी नवीन इमारत बांधण्याचे नियोजन करण्यात आले. मार्च २०२४ मध्ये या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि त्यासाठी २.९१ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला. जुन्या इमारतीचा वापर करून नऊ वर्गखोल्या बांधण्यात आल्या.

या कामासाठी १ कोटी ७८ लाख रुपये खर्च करण्यात आले. फेब्रुवारी २०२६ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. मात्र, पटांगण, प्रवेशद्वार, सुरक्षा भिंत आणि जुन्या इमारतीची दुरुस्ती यांसारखी महत्त्वाची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

जुलैमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तरीही या इमारतीचा वापर सुरू करण्यात आलेला नाही. मंजूर प्रस्तावानुसार शाळेचे पटांगण, प्रवेशद्वार, सुरक्षा भिंत आणि इतर आवश्यक कामे पूर्ण करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. जुन्या इमारतीची दुरुस्तीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नवीन इमारत तयार असूनही विद्यार्थ्यांना तेथे शिक्षण घेता येत नसल्याचे चित्र आहे. विशेष असे की मनपाच्या सार्वजन‍िक विभागाने कामे पूर्ण झाले असल्याचा आपल्या माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

शाळेसमोरच देशी दारूचे दुकान; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

एकीकडे शाळेची नवीन इमारत वापराविना पडून असताना, दुसरीकडे शाळेच्या अगदी समोर अधिकृत चिल्लर देशी दारूचे दुकान असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. या दुकानामुळे शाळा नवीन इमारतीत सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा परिसरात होत असल्याचे सांगितले जाते. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना सुरक्षित, शांत आणि शैक्षणिकदृष्ट्या पोषक वातावरण मिळणे अपेक्षित असते. मात्र, शाळेसमोरील दारूच्या दुकानामुळे या वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दारू पिण्यासाठी येणारे काही लोक शाळेच्या भिंतीलगत, पटांगणाजवळ आणि प्रवेशद्वार परिसरात आणि आत उघड्यावर लघुशंका करतात.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपूर्ण कामांमुळे शाळा रखडली?

महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यक कामे अपूर्ण राहिल्याने शिक्षण विभागाने अद्याप ही इमारत ताब्यात घेतलेली नसल्याचे सांगितले जात आहे. अपूर्ण बांधकाम आणि सुरक्षेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना नवीन इमारतीत हलविण्यात आले नसल्याची चर्चा आहे. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली शाळेची इमारत वापराविना पडून आहे, तर विद्यार्थी आजही भाड्याच्या इमारतीत शिक्षण घेत आहेत. मग या बांधकामावर खर्च करण्यात आलेले कोटयवधी रुपये वाया गेले काय? अपूर्ण कामे कधी पूर्ण होणार आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या नवीन इमारतीत शिक्षण घेण्याची संधी कधी मिळणार, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More