– मनपाच्या मालकीच्या असल्याचा दावा असलेल्या लोखंडी खुर्च्या खासगी भूखंडावर ठेवल्याचा आरोप
– पांढरा रंग लावून ओळख झाकल्याचा दावा, निष्पक्ष चौकशी होणार का?
The Exposer
नागपूर : एक हजार चौरस फुटांच्या भूखंड व्यवहारासंदर्भातील गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या साहेबांभोवती आता महानगरपालिकेच्या लोखंडी खुर्च्यांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. सार्वजनिक परिसरात नागरिकांच्या वापरासाठी ठेवण्यात आलेल्या मनपाच्या मालकीच्या असल्याचा दावा असलेल्या खुर्च्या कथितरीत्या खासगी भूखंडावर नेऊन ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर खुर्च्यांवरील मूळ ओळख झाकण्यासाठी त्यांना पांढरा रंग लावण्यात आल्याचाही दावा तक्रारकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचा कथित खासगी वापर नेमका कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मनपाच्या खुर्च्या खासगी भूखंडावर कशा पोहोचल्या?

मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या लोखंडी खुर्च्या सुरुवातीला संबंधित वादग्रस्त भूखंडावर एकत्र करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर खुर्च्यांवर पांढरा रंग लावून त्यांची मूळ ओळख झाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पुढे या खुर्च्या साहेबांच्या बंगल्यासमोरील वाहनतळासाठी वापरल्या जाणाऱ्या खासगी भूखंडावर हलविण्यात आल्याचा दावाही करण्यात येत आहे.
तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काही खुर्च्या साहेबांच्या बंगल्यासमोर ठेवण्यात आल्या आहेत, तर आणखी काही खुर्च्या शेजारील वादग्रस्त भूखंडावर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही खुर्च्यांवर पांढरा रंग दिल्यानंतरही त्यांची मूळ ओळख पूर्णपणे झाकली गेली नसल्याचा दावाही करण्यात येत आहे.
मात्र, या खुर्च्या प्रत्यक्षात मनपाच्या मालकीच्या आहेत का, त्या कोणाच्या आदेशाने खासगी जागेवर हलविण्यात आल्या आणि त्यासाठी अधिकृत परवानगी होती का, याची पडताळणी होणे आवश्यक आहे. खुर्च्यांवरील रंगकाम कोणी केले आणि त्यामागील कारण काय होते, हेदेखील चौकशीतून स्पष्ट होऊ शकते.
एक हजार चौरस फुटांच्या भूखंडानंतर खुर्च्यांचा मुद्दा ऐरणीवर!

संबंधित साहेबांवर एक हजार चौरस फुटांच्या भूखंड व्यवहारासंदर्भात यापूर्वी पूरक तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे. तथापि, या आरोपांची सत्यता आणि संबंधित प्रकरणातील कायदेशीर जबाबदारी यांचा निर्णय तपास यंत्रणा व न्यायप्रक्रियेद्वारेच होणे अपेक्षित आहे.
आता मनपाच्या खुर्च्यांबाबत करण्यात आलेल्या दाव्यांमुळे आणखी काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक जागेवरील खुर्च्या संबंधित जागेवर कशा पोहोचल्या आणि त्यांची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, याची स्वतंत्रपणे चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.
मनपाने खुर्च्यांच्या मालकीचे अभिलेख तपासावेत!
या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुढील बाबींची चौकशी करावी, अशी मागणी या निमित्ताने पुढे अली आहे.
मालकीची पडताळणी : संबंधित लोखंडी खुर्च्या मनपाच्या मालकीच्या आहेत का, याची अधिकृत नोंद तपासावी.
खरेदी व वाटपाचे अभिलेख : खुर्च्यांची खरेदी, सार्वजनिक ठिकाणी त्यांची स्थापना आणि देखभालीसंबंधीच्या नोंदी पडताळाव्यात.
स्थलांतराची परवानगी : खुर्च्या मूळ ठिकाणाहून हलविण्याचे आदेश कोणी दिले आणि त्यासाठी परवानगी होती का, हे स्पष्ट करावे.
रंगकामाची चौकशी : खुर्च्यांवर पांढरा रंग कोणी लावला आणि त्यामागील कारण काय होते, याची तपासणी करावी.
नियमांनुसार कारवाई : सार्वजनिक मालमत्तेचा अनधिकृत खासगी वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी.
भूखंडानंतर खुर्च्यांचा वाद; उत्तरदायित्वाची कसोटी!

पदवीधरांच्या विश्वासाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जीवनातील पारदर्शकता, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण आणि कायद्याप्रती बांधिलकी हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. संबंधित व्यक्तींविषयी गंभीर आरोप समोर आल्यास त्यांची सत्यता निष्पक्षपणे तपासली जाणे प्रशासनासाठी आवश्यक झाले आहे.
प्रश्न केवळ खुर्च्यांचा नाही, तर सार्वजनिक मालमत्तेच्या उत्तरदायित्वाचा आहे! जर संबंधित खुर्च्या महानगरपालिकेच्या मालकीच्या असतील, तर त्या खासगी भूखंडावर कशा पोहोचल्या? त्यांचे स्थलांतर अधिकृत परवानगीने झाले होते का? त्यांच्यावर पांढरा रंग लावण्यामागे नेमके कारण काय होते?
या प्रश्नांची उत्तरे केवळ आरोप-प्रत्यारोपांतून नव्हे, तर अधिकृत अभिलेख, प्रत्यक्ष पाहणी आणि निष्पक्ष चौकशीतूनच मिळू शकतील. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी आणि आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.
The Exposer | Depth, Truth & Impact
Author: संतोष तायडे
संपादक















