दीक्षाभूमी ते कामठी ५५ रुपये, तर मोरभवन ते ड्रॅगन पॅलेस ५० रुपये भाडे; १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान विशेष व्यवस्था
The Exposer
नागपूर : ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी आणि कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नागपूर विभागाने विशेष यात्रा बससेवेची व्यवस्था केली आहे. १९ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही सेवा चालविण्यात येणार आहे.
२० ऑक्टोबर रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांतून लाखो भाविक आणि अनुयायी दर्शनासाठी नागपुरात येतात. दीक्षाभूमी येथे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविक कामठी येथील प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पललाही भेट देतात. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने विशेष बससेवेचे नियोजन केले आहे.
दीक्षाभूमी ते कामठी ५५ रुपये भाडे
एसटी महामंडळाच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, दीक्षाभूमी (काचीपुरा) ते कामठी (ड्रॅगन पॅलेस) या मार्गावर प्रति प्रवासी ५५ रुपये, तर मोरभवन ते ड्रॅगन पॅलेस या मार्गावर ५० रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांना सवलत
एसटी महामंडळाच्या नियमानुसार, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी आणि १२ वर्षांखालील मुलांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
विशेष बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला भेट देणाऱ्या भाविकांनी तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे जाणाऱ्या अनुयायांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर विभाग यांनी केले आहे.
Author: प्रमोद गणवीर
पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर















