– वाठोड्यात पोलिसांचा छापा; ५०० रुपयांच्या नोटांसारखी छपाई असलेल्या कागदांचा साठा जप्त, लॅपटॉप–कलर प्रिंटरसह ३७.८३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
The Exposer
नागपूर : भाड्याच्या घरात ५०० रुपयांच्या नोटांसारखी छपाई करण्याचा कथित प्रकार वाठोडा पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. वाठोडा येथील थ्री स्टार को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील एका फ्लॅटवर छापा टाकला असता, नोटांसारखी छपाई असलेले कागद, लॅपटॉप, कलर प्रिंटर, पेपर कटर, शाईच्या बाटल्या आणि अन्य साहित्य आढळून आले. पोलिसांनी या साहित्याची एकूण किंमत ३७ लाख ८३ हजार ६०० रुपये असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी पुष्पम कृष्णा बंडाने (वय २९) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १७८, १८० आणि १८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, जप्त केलेले कागद प्रत्यक्षात बनावट चलनी नोटा आहेत की केवळ नोटांसारखी छपाई केलेले कागद, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणातील छपाईचा उद्देश आणि संभाव्य आर्थिक व्यवहारांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
दोन महिन्यांचे भाडे थकले अन् संशयास्पद प्रकाराचा उलगडा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठोडा येथील प्लॉट क्रमांक १८, थ्री स्टार को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट रमेश गंगाधर हरडे यांनी २६ सप्टेंबर २०२५ पासून पुष्पम बंडाने याला भाड्याने दिला होता. गेल्या दोन महिन्यांपासून भाडे मिळत नसल्याने मकानमालक त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तीन दिवसांपासून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता रमेश हरडे भाडे मागण्यासाठी फ्लॅटवर पोहोचले. दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दुसऱ्या मास्टर चावीने दरवाजा उघडला. आत सोफ्यावर ५०० रुपयांच्या नोटांसारखी छपाई असलेले कागद विखुरलेले दिसताच त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने वाठोडा पोलिसांना माहिती दिली.
एका बाजूला, तर काही कागदांवर दोन्ही बाजूंना छपाई!
पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत फ्लॅटची झडती घेतली. काही कागदांवर ५०० रुपयांच्या नोटांसारखी अक्षरे, चिन्हे आणि डिझाइन एका बाजूला छापलेली होती, तर काही कागदांवर दोन्ही बाजूंना छपाई करण्यात आली होती. प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या बंडलांमध्येही असे कागद आढळून आले.
झडतीदरम्यान ASUS कंपनीचा लॅपटॉप, EPSON कंपनीचा कलर प्रिंटर, दोन A4 पेपर कटर, कोरे कागद, विविध रंगांच्या शाईच्या बाटल्या, केबल वायर आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य पोलिसांनी जप्त केले. या साहित्याचा वापर कशासाठी केला जात होता? नोटांसारखी छपाई करण्यामागे नेमका उद्देश काय होता? या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत.
३७.८३ लाखांचा मुद्देमाल; बनावट नोटांचे मूल्य अद्याप स्पष्ट नाही!
पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत ३७ लाख ८३ हजार ६०० रुपये असल्याचे नमूद केले आहे. यामध्ये नोटांसारखी छपाई असलेल्या कागदांच्या खेपेला मोठे मूल्य देण्यात आले आहे. लॅपटॉपची किंमत ३० हजार रुपये, कलर प्रिंटरची किंमत ४० हजार रुपये आणि दोन पेपर कटरची किंमत १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, उपलब्ध पोलीस माहितीत छापील कागदांची संख्या आणि त्यांच्या मूल्याबाबत काही विसंगती दिसून येते. त्यामुळे जप्त साहित्याचे एकूण मूल्य आणि प्रत्यक्ष बनावट चलनी नोटांचे मूल्य यांची गल्लत करता कामा नये. ३७.८३ लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त झाल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. हा आकडा जप्त साहित्याच्या नमूद केलेल्या एकूण मूल्याशी संबंधित आहे.
बनावट चलन बाजारात आणण्याचा प्रयत्न झाला होता का?
या प्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५३/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १७८, १८० आणि १८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त कागदांचा वापर केवळ छपाईसाठी होत होता की त्यांना अस्सल चलनी नोटा म्हणून बाजारात आणण्याचा प्रयत्न झाला होता, हा तपासातील महत्त्वाचा मुद्दा आहे. कागदांचे न्यायवैज्ञानिक परीक्षण, छपाईमागील उद्देश, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य अन्य सहभागी यांची माहिती तपासातून स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कारवाई
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाठोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटे, पोलीस उपनिरीक्षक विकांत कारटकर तसेच पोलीस कर्मचारी अनिल धनोले, गणेश बोंद्रे, आशिष श्रीखंडे, चंदन यादव, चेतन उतखेडे आणि विपीन पिल्लेवान यांनी या कारवाईत सहभाग घेतला. भाड्याच्या घरात आढळलेल्या या संशयास्पद छपाईमागील सत्य काय, या प्रकाराचा व्याप किती मोठा आहे आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा आता पोलिसांच्या पुढील तपासातून होणार आहे.
Author: संतोष तायडे
संपादक














