१० लाखांचे सोने चोरीला; दागिने शोधण्यासाठी पोलिसांनी मागितले १ लाख रुपये? FIR साठीही टाळाटाळ केल्याचा आरोप!

– पीडित ज्येष्ठ महिलेने दाखवले धाडस; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेताच गुन्हा दाखल झाल्याचा दावा, अंबाझरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह

The Exposer
नागपूर : घरातून अंदाजे १० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. चोरीचा तपास करून दागिने परत मिळवून देण्याऐवजी पोलिसांकडून एक लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित ज्येष्ठ महिलेने केला आहे. एवढेच नव्हे, तर चोरीची तक्रार देऊनही एफआयआर नोंदविण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, या कथित प्रकाराविरोधात गप्प न बसता पीडित महिलेने धाडस दाखवले आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे थेट दाद मागितली. सहाय्यक पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतरच १४ ऑक्टोबर २०२६ रोजी एफआयआर दाखल झाल्याचे त्यांच्या तक्रारीत नमूद आहे. या आरोपांमुळे अंबाझरी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यासंदर्भात पीडित फिर्यादी लता दुबे यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस आयुक्तांकडे पोस्टाद्वारे सादर केलेल्या लेखी तक्रारीत संपूर्ण घटनाक्रम मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी घराबाहेर कुलूप लावलेले असताना घरातील कपाटाचे कुलूप तोडून अंदाजे १० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. या घटनेची त्यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. मात्र, तक्रार देऊनही तत्काळ एफआयआर दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दागिने परत मिळविण्यासाठी एक लाख रुपये?

या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर आरोप डी.बी. स्क्वॉडच्या कथित पैशांच्या मागणीबाबत आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांचे नातेवाईक दिनेश शर्मा यांना चोरीला गेलेले दागिने परत मिळवून देण्याच्या बदल्यात एक लाख रुपये देण्यास सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. शर्मा यांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. चोरीच्या तपासाच्या नावाखाली खरोखरच पैशांची मागणी झाली असेल, तर हा प्रकार गंभीर ठरू शकतो. या आरोपांची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नसल्याने याप्रकरणी निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

पीडित महिलेचे धाडस; न्यायासाठी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव!

चोरीची घटना घडल्यानंतर अपेक्षित कारवाई (एफआयआर) होत नसल्याची भावना निर्माण झाल्यानंतरही फिर्यादी लता दुबे यांनी हार मानली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी अखेर सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील सिंग पवार यांच्याकडे धाव घेतली. तक्रारीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी एसीपी यांची भेट घेतल्यानंतर प्रकरणात कारवाईचे निर्देश मिळाले. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला, असे तक्रारदार महिलेने नमूद केले आहे.

अन्याय झाल्याची भावना मनात असताना भीतीपोटी गप्प न बसता, आपल्या हक्कांसाठी थेट एसीपी आणि आता सीपी कार्यलयाकडे दाद मागणे हे पीडित महिलेने दाखवलेले धाडस आहे. त्यांच्या तक्रारीतील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आणि चोरीला गेलेल्या एकूण एक दागिन्यांचा शोध घेणे, ही आता महत्त्वाची बाब ठरली आहे.

एफआयआरसाठी वरिष्ठांची भेट का घ्यावी लागली?

या प्रकरणामुळे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. चोरीची लेखी तक्रार दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यास विलंब का झाला? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरच कारवाईला गती मिळाली का? आणि चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी नेमकी कोणती पावले उचलली? या प्रश्नांची उत्तरे अधिकृत चौकशीतून समोर येणे आवश्यक आहे.

पोलीस आयुक्तांकडे स्वतंत्र तपासाची मागणी

फिर्यादी लता दुबे यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर करून अंबाझरी पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी आणि डी.बी. स्क्वॉडच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण गुन्हे शाखा, नागपूर किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

१० लाखांचे सोने परत मिळणार का? पोलिसांच्या चौकशीकडे लक्ष

पीडित महिलेने दाखवलेल्या धाडसानंतर आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. चोरीचा तपास कितपत पुढे गेला आहे, दागिने हस्तगत झाले आहेत का आणि पोलिसांवरील आरोपांची चौकशी होणार का, हे प्रश्न अद्याप महत्त्वाचे आहेत. पीडित महिलेने धाडसाने मांडलेल्या तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस प्रशासनाने वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रश्न जनहिताचा आहे, त्यामुळे यासंदर्भात अंबाझरी पोलिसांनी त्यांचा पक्ष ठेवल्यास त्याला सुद्धा प्रसिद्धी दिली जाईल.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More