– पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी घेतले गंभीर्याने, दिले चौकशीचे आदेश
– कलमना विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राहुल ओव्हाळ यांच्याकडे तपास
The Exposer
नागपूर : भूखंडाच्या दिवाणी वादातून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी पदाचा गैरवापर करीत दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले आहेत. सदर चौकशी कलमना विभागाचे सहायक पोलिस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्याकडे सोपविण्यात आली असून चौकशी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
इंदिरा माता नगर येथील अनिल ताराकांत सहारे यांनी पोलिस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्लॉट क्रमांक 639 संदर्भातील प्रकरण दिवाणी न्यायालयात प्रलंबित असताना काही व्यक्तींनी खोट्या खंडणीच्या तक्रारीद्वारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संबंधित तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात न पाठविता थेट गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी पाठविण्यात आल्याने संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, युनिट क्रमांक 5, गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांच्या काळात सर्व न्यायालयीन कागदपत्रे सादर करून सहकार्य केले होते. मात्र, पीआय श्री बुवा यांच्या बदलीनंतर त्याजागी आलेले युनिट क्रमांक 5, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी तक्रारदाराला वारंवार सूचना पत्र पाठवून चौकशीसाठी बोलाविले व “एका आठवड्यात भूखंड खाली करा, अन्यथा 25 लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकतो,” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याचदरम्यान एका अनोळखी व्यक्तीकडूनही फोनवरून भूखंड खाली करण्यासाठी धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे तक्रारदार व त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मानसिक, शारीरिक व कायदेशीर छळ होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) व मोबाईल सीडीआर तपासून संगनमताची चौकशी करण्यात यावी, तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी या गंभीर तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











