– दोघा आरोपींचा समावेश, २.२९ लाखांची रोकड
– ड्रग्ज आणि वाहन जप्त ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत पोलिसांची धडक कारवाई
The Exposer
नागपूर : शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर – एकच ध्येय, नशामुक्त समाज घडवूया’ या विशेष मोहिमेंतर्गत गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रोन) पावडरची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एम.डी. पावडर, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकी वाहनासह एकूण ७.०४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेशाखेचे पथक भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना संघर्ष नगर परिसरात संशयास्पद हालचाली करणारे दोन युवक आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांची ओळख विजय नंदलाल रहांगडाले (४४) आणि शहबाज फिरोज शहा (२७) अशी पटली. संशयावरून पोलिसांनी झडती घेतली असता आरोपींकडून ५२ ग्रॅम एम.डी. पावडर, मोबाईल फोन आणि दुचाकी वाहन आढळून आले. वाहनाची तपासणी करताना त्यामध्ये २ लाख २९ हजार रुपयांची रोख रक्कम मिळाली. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींनी ही एम.डी. पावडर सोहेल उर्फ ‘भांजा’ नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू असून या रॅकेटमागील इतर आरोपींची माहितीही पोलिसांकडून घेतली जात आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी अमली पदार्थांची खरेदी-विक्री केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांनुसार भांडेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपींच्या नेटवर्कचा माग काढण्यासाठी पुढील तपास सुरू असून शहरातील ड्रग्ज तस्करीविरोधात पोलिसांनी आणखी कठोर मोहीम हाती घेतली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











