स्टील कॉइलच्या ट्रकमध्ये लपवला 150 किलो गांजा; नागपुरात 1.49 कोटींची धडक कारवाई

– रिंग रोडवर सामाजिक सुरक्षा शाखेचा सापळा; ओडिशातील दोन तस्कर जेरबंद
The Exposer
नागपूर : अंमली पदार्थ तस्करांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला, तरी नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने त्यांच्या डावावर पाणी फेरले आहे. स्टील कॉइलच्या मालवाहू ट्रकमध्ये चतुराईने लपवून आणला जात असलेला तब्बल 150.520 किलो गांजा जप्त करत पोलिसांनी दोन तस्करांना अटक केली. या कारवाईत 1 कोटी 49 लाख 79 हजार 837 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ओडिशाहून नागपूरमार्गे मोठ्या प्रमाणात गांजाची खेप आणली जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगिंदर सिंग ढाब्यासमोर, नागपूर-हैदराबाद रिंग रोडवर सापळा रचण्यात आला. मंगळवारी पहाटे सुमारे 4.40 वाजता संशयित अशोक लेलँड ट्रक (OD-34-H-4489) अडवून त्याची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान ट्रकमधील स्टील कॉइलच्या मालाच्या आड गांजाची मोठी खेप लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून 37.63 लाख रुपये किमतीचा 150.520 किलो गांजा, 40 लाखांचा ट्रक, 71.98 लाख रुपयांची स्टील कॉइल तसेच मोबाईल फोन असा एकूण 1.49 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणात जोगेश धर्मोधर देवुरी (30) आणि महेंद्र हुरदा देवुरी (40), दोघेही जिल्हा अंगुल (ओडिशा) येथील रहिवासी, यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी ही गांजाची खेप ओडिशातील बाबाजी डेहरा आणि विष्णू प्रधान यांच्या मदतीने वाहतूक केल्याची माहिती दिली असल्याचे समोर आले आहे.

गांजाची खेप नेमकी कुठे जाणार होती?

पोलिसांसमोर आता सर्वात मोठे आव्हान म्हणजे ही गांजाची खेप नेमकी कोणाकडे पोहोचणार होती आणि तिच्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचा शोध घेणे. प्राथमिक तपासात ही केवळ वाहतूक नसून संगठित अंमली पदार्थ तस्करी नेटवर्कचा भाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुरवठादार, स्थानिक संपर्क, खरेदीदार आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाची धडक कारवाई

पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार समाधान गीते, किशोर ठाकरे, प्रकाश माथनकर, लक्ष्मण चवरे तसेच शेषराव राऊत, अश्विन मांगे, कुणाल मसराम, समीर शेख आणि कुणाल बोडखे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More