– समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई, दोघांना अटक
– सामाजिक सुरक्षा विभागाची फिल्मीस्टाईल कारवाई
– कुर्ल्यातील पुरवठादार तस्कराचा पोलिसांकडून शोध
The Exposer
नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत समृद्धी महामार्गावरील वायफळ टोल नाक्याजवळ दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत तब्बल ११ लाख २१ हजार ९०० रुपये किमतीचे ११३.१९० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त करण्यात आले असून एकूण ११ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. १० जून २०२६ रोजी समृद्धी महामार्गावरील वायफळ टोल नाका परिसरात सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान सय्यद शहबाज कुरेशी (वय २०) रा. कसाबपुरा, नागपूर आणि शकील अहमद अब्दुल खालिद (वय ३५) रा. मोमीनपुरा, नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी मुंबईतील कुर्ला परिसरात राहणाऱ्या ‘डिश’ नावाच्या इसमाकडून एमडी ड्रग्ज खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. हे अमली पदार्थ ट्रॅव्हल्सद्वारे नागपुरात आणले जात असताना सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या कारवाईत ११३.१९० ग्रॅम एमडी ड्रग्ज, तीन मोबाईल फोन आणि ४,५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या यशस्वी कारवाईत पोलिस निरीक्षक दर्शन पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ननवरे, हवालदार समाधान गिते, शेषराव राऊत तसेच पोलिस कर्मचारी अश्विन मांगे, कुणाल मसराम, समीर शेख, कुणाल बोडखे, किशोर आणि सायबर युनिटचे पीएसआय विवेक झिंगरे व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, या अमली पदार्थ रॅकेटमागील मुख्य पुरवठादार असलेल्या मुंबईतील कुर्ला परिसरातील ‘डिश’ नामक आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











