परवाना मंजुरीसाठी ‘दर’ ठरवणाऱ्या मुख्य अभियंत्याला एसीबीचा दणका; ३० हजारांची लाच ठरली महागात!

– नागपुरात भ्रष्टाचारविरोधी विभागाची धडक कारवाई
The Exposer
नागपूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयातील मुख्य अभियंता सुभाष बबन भुजबळ यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
एसीबीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार हे नोंदणीकृत कंत्राटदार असून महाराष्ट्र शासनाची विविध कामे करतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या शासकीय कामांसाठी आवश्यक असलेल्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी त्यांनी ऑनलाइन अर्जासह संबंधित कागदपत्रे सादर केली होती. मात्र, या परवान्याचे नूतनीकरण मंजूर करून देण्यासाठी मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. बुधवारी (१० जून) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयातील आपल्या दालनात तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुजबळ यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक भारती गुरनुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा यशस्वीरीत्या पार पाडला.
दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्याच्या वतीने एजंट शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More