– जीएमसी अँड हॉस्पिटल एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप. सोसायटी प्रकरण तापले; ठेवीदारांविरोधात तक्रारी, पोलिसांकडून चौकशीची शिफारस
The Exposer
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलशी संबंधित दि मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर येथील ठेवीदारांचे पैसे अडकल्याने निर्माण झालेला वाद आता अधिकच गडद झाला आहे. ठेवीदारांनी आपल्या ठेव रकमांच्या परताव्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, त्यांच्या विरोधातच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अजनी पोलिसांकडे 24 एप्रिल 2026 रोजी तक्रार केल्याची बाब समोर आली आहे.
तर या तक्रारीची एक प्रतिलिपी पोलिस आयुक्तांना दिली आहॆ. पोलिस आयुक्तांनी सदरचा अर्ज पोलिस उपायुक्त झोन 4, यांना पाठवून चौकशीचे आदेश दिले आहॆ. तर झोन 4, यांनी पोलिस आयुक्तांच्या निर्देशनुसार अजनी पोलिसांना चौकशी अंती योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करण्यास म्हटले आहे.
उपलब्ध पत्रव्यवहारानुसार, काही ठेवीदार व भागधारक कार्यालयात येऊन गोंधळ घालतात, कर्मचाऱ्यांना धमकावतात, कामकाजात अडथळे निर्माण करतात आणि पदाधिकाऱ्यांना मानसिक त्रास देतात, असा आरोप सोसायटीने केला आहे. या आरोपांच्या आधारे अजनी पोलिस ठाण्यासह पोलिस आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली.
मात्र, दुसरीकडे ठेवीदारांचे म्हणणे वेगळे आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ पासून कर्जाच्या हप्त्यांची मेडिकल प्रशासनाकडून दरमहाच्या वेतनातील कपात बंद झाल्यानंतर सोसायटीची आर्थिक स्थिती डळमळीत झाली असून, मुदत संपूनही ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचा परतावा मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या आयुष्यभराच्या बचती अडकल्या असल्याने ते वारंवार सोसायटीच्या कार्यालयात जाऊन आपल्या पैशांची मागणी करीत असल्याचे सांगितले जाते.
पोलिसांकडून अर्ज पुढे वर्ग
पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल झालेल्या अर्जावर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याला निर्देश देण्यात आले. त्यानंतर अजनी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा प्राथमिक आढावा घेतला. पोलिसांनी आपल्या अहवालात नमूद केले की, संबंधित संस्थेतील आर्थिक व्यवहार, ठेवीदारांचे दावे आणि ठेव परताव्याचा प्रश्न हा त्यांच्या विभागाशी थेट संबंधित नसून, या विषयाची चौकशी सक्षम प्राधिकरणांकडून होणे आवश्यक आहे. त्यामुळे अजनी पोलिसांनी सोसायटीचा तक्रार अर्ज 25 मे 2026 रोजी शासकीय मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांकडे वर्ग केला आहॆ. यानंतर मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांनी सोसायटीने तक्रार अर्जा सोबत दिलेल्या ठेवीदारांची यादी नुसार ठेवीदार कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवला आहॆ. तसे पत्र 3 जून 2926 रोजी जारी केले आहॆ. तर अंदाजे ठेवीदार हे 800च्या घरात आहे. त्यांची कोट्यावधीची ठेवी सोसायटीत जमा आहॆ. मात्र निर्धारित कालावधी संपूनही ठेवीची रक्कम सोसायतीने मुद्दल व नफ्यासह परत केली नसल्याचा संताप कायम आहॆ. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधित ठेवीदार कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागविले आहे. सोसायटीने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का, तसेच ठेवीदारांच्या आक्षेपांमागील कारणे काय आहेत, याबाबत माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
– ठेवीदारांचा सवाल, संकटात सोसायटी
ठेवीदारांमध्ये मात्र तीव्र नाराजी आहे. “आमचे पैसे वेळेवर परत मिळत नसल्याने आम्ही न्याय मागत आहोत. पैसे अडकले म्हणून विचारणा केली तर आम्हालाच त्रासदायक ठरवले जात आहे,” अशी भावना अनेक ठेवीदार व्यक्त करीत आहेत. ठेवीदारांचे पैसे नेमके कधी मिळणार, सोसायटीची आर्थिक स्थिती काय आहे? ठेव परताव्याबाबत ठोस कृती आराखडा का जाहीर केला जात नाही? पोलिस तक्रारींच्या माध्यमातून ठेवीदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तर होत, नाही ना? अशा विविध प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित असून, हजारो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंतच्या ठेवी अडकलेल्या सदस्य आणि ठेवीदारांचे लक्ष आता प्रशासन, सहकार विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. दुसरीकडे याच संदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे, हे बिशेष.
(टीप : संबंधित सोसायटी, पदाधिकारी किंवा प्रशासन यांची अधिकृत बाजू उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)
Author: संतोष तायडे
संपादक











