फरार ‘ऑटो’ला बेड्या; चोरीचे दागिने आणि रॉयल एनफिल्डसह २.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

– गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ ची धडाकेबाज कारवाई

The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने अटक करत मोठे यश संपादन केले आहे. आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रॉयल एनफिल्ड दुचाकी जप्त करण्यात आली असून एकूण २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण उर्फ ऑटो अशोक ठाकरे (वय २०, रा. नवाबपुरा, कोतवाली) हा आरोपी हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील अप.क्र. ४८०/२०२६ मधील घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे होता. त्याचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांसह हुडकेश्वर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ३४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्हा करताना वापरण्यात आलेली रॉयल एनफिल्ड (MH-49 CK-6614) दुचाकी जप्त केली.
या कारवाईत एकूण २.८४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी त्याला हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखा युनिट-३च्या या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असून आरोपीच्या इतर गुन्हेगारी कृत्यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More