– मोबाईल व रोख रक्कम हिसकावून तिघे फरार; घटनेचा व्हिडिओ व्हायरल, शहरातील रात्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
The Exposer
नागपूर : शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून मेडिकल चौक परिसरात एका फूड डिलिव्हरी बॉयला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून पोलिस गस्त व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास संबंधित डिलिव्हरी बॉय पार्सल पोहोचवून घरी परतत होता. यावेळी राजाबाक्षा हनुमान मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन युवकांनी त्याचा पाठलाग केला. काही अंतरावर त्याला अडवून चाकूचा धाक दाखवत धमकावले आणि त्याच्याकडील मोबाईल फोन तसेच सुमारे ३ हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून पळ काढला.
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून संबंधित फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. व्हिडिओमध्ये संशयित युवकांच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे.
पीडिताच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंत काम करणारे डिलिव्हरी बॉय, कॅब चालक तसेच इतर कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून शहरातील रात्रीच्या पोलिस गस्तीच्या प्रभावीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











