– सकाळी फिरायला निघाल्या… पण परतल्याच नाहीत
– माझ्यामुळे घरच्यांना त्रास होतो…या शब्दांनी हळहळ
The Exposer
नागपूर : रोजच्या सवयीप्रमाणे सकाळी घराबाहेर फिरण्यासाठी पडलेल्या एका वृद्ध महिलेची संध्याकाळपर्यंत कुटुंबीय वाट पाहत राहिले. मात्र, त्यांची प्रतीक्षा अखेर दुःखद ठरली. गांधीनगर परिसरातील उषा अरुण खापर्डे (८०) यांचा मृतदेह एका अपार्टमेंटच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला. “माझ्यामुळे घरातील लोकांना त्रास होतो,” असे वारंवार बोलणाऱ्या उषाताईंच्या मृत्यूने अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण केले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या निधनाने वृद्धांच्या भावनिक वेदना, एकाकीपणा आणि मानसिक संघर्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
अंबाझरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा खापर्डे या सकाळी फिरण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. बराच वेळ उलटूनही त्या परत न आल्याने चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली.
तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये उषा खापर्डे या एकट्याच एका अपार्टमेंटजवळील पाण्याच्या टाकीकडे जाताना दिसून आल्या. त्यानंतर शोध घेतला असता टाकीत त्यांचा मृतदेह आढळून आला. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नसली तरी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, उषा खापर्डे या दीर्घकाळापासून पाठदुखीच्या त्रासाने ग्रस्त होत्या. त्या अनेकदा “माझ्यामुळे घरातील लोकांना त्रास होतो” असे बोलत असत. त्यांच्या निधनानंतर या शब्दांनी कुटुंबीय आणि परिचितांच्या मनाला चटका लावला आहे.
दरम्यान, त्या पाण्याच्या टाकीपर्यंत कशा पोहोचल्या आणि टाकीत पडण्याची किंवा बुडण्याची परिस्थिती नेमकी कशी निर्माण झाली, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
वृद्धांच्या भावनिक जगाकडे पुन्हा लक्ष वेधणारी घटना
या घटनेने वृद्धांच्या एकाकीपणा, मानसिक ताण आणि त्यांच्या भावनिक गरजांकडे समाजाने अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. चेहऱ्यावर हास्य असले तरी मनात किती वेदना दडलेल्या असू शकतात, याची ही घटना वेदनादायी जाणीव करून देणारी ठरली आहे. अंबाझरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक











