– एनडीपीएस पथकाची धडक कारवाई; 16.13 लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या व्यापाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत गुन्हे शाखेच्या एनडीपीएस (अंमली पदार्थ विरोधी) पथकाने गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज, घातक शस्त्रे आणि चोरीचे संशयित दागिने जप्त केले. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 जून रोजी पहाटे 2.50 ते सकाळी 7.40 वाजेदरम्यान विश्वासनगर परिसरातील दाऊद पान सेंटरजवळ सार्वजनिक रस्त्यावर एनडीपीएस पथक गस्त घालत असताना संशयित हालचाली आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी दोन पंचांसमक्ष संशयितांची झडती घेतली असता 16 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर, तसेच तलवार व सत्तुर जप्त करण्यात आले.
यानंतर आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली असता 88.200 ग्रॅम पिवळ्या धातूचे दागिने व 876.800 ग्रॅम पांढऱ्या धातूचे दागिने मिळून आले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 16 लाख 13 हजार 740 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आकाश राजू हतागडे (37), रा. विश्वासनगर, गिट्टीखदान, योगेश संजू सीरिया (30), रा. गवळीपुरा, सदर, आकाश गजानन टाले (30), रा. मानव सेवा नगर, नागपूर, तर आकाश कटारिया उर्फ अक्कू हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
ड्रग्ज पुरवठा साखळी उघड
प्राथमिक चौकशीत आरोपी आकाश हतागडे याने योगेश सीरिया याच्याकडून एमडी पावडर खरेदी करून ती आकाश टाले याला देण्याचे ठरविल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपी योगेश सीरिया याने ही एमडी फरार आरोपी आकाश कटारिया उर्फ अक्कू याच्याकडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी फरार आरोपीचा शोध तीव्र केला आहे.
गंभीर गुन्ह्यांतील आरोपी
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काहींवर यापूर्वी खून, खंडणी, चोरी, आर्म्स ॲक्ट, पोक्सो तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायदा, भारतीय हत्यार कायदा तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या साखळीचा आणखी मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज, घातक शस्त्रे आणि चोरीचे संशयित दागिने जप्त केले. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











