– प्रतिबंधित तंबाखू व खर्रा निर्मितीच्या मशीनसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे शाखा युनिट क्र. ०६ ने मोठी कारवाई करत जरीपटका परिसरात छापा टाकला. या कारवाईत प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा तसेच खर्रा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन मशीनसह एकूण ४४ हजार ९७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन पंचांच्या उपस्थितीत ही रेड कारवाई करण्यात आली. यावेळी सुरज निरंजन मेश्राम (वय २८), रा. गल्ली नं. १०, बाराखोली, रिपब्लिकन नगर, जरीपटका, नागपूर याच्याकडे प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला.
या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व विनियम २०११ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून जरीपटका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखा युनिट क्र. ०६ च्या या कारवाईमुळे शहरातील प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहॆ.
Author: संतोष तायडे
संपादक











