– नागपूरच्या न्युरॉन रुग्णालयातील धक्कादायक घटना
– रुग्णालयातील खोलीत डॉक्टर मृतावस्थेत आढळले
– एनस्थेशिया इंजेक्शनद्वारे आत्महत्येचा प्राथमिक संशय
The Exposer
नागपूर : नागपूरातील नामांकित न्युरॉन ब्रेन, स्पाईन अँड क्रिटिकल केअर सेंटर येथे सोमवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अहोरात्र झटणारे ४२ वर्षीय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार हे रुग्णालयातील एका बंद खोलीत मृतावस्थेत आढळून आले.
प्राथमिक माहितीनुसार, डॉक्टरांनी एनस्थेशिया औषधाचा वापर करून टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपासून ते वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली असून, ते मागील काही दिवसांपासून घरीही गेले नव्हते, अशी चर्चा आहे. सोमवारी सकाळी सुमारे ९.१५ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यशवंत स्टेडियमजवळील न्यूरॉन्स ब्रेन हॉस्पिटलमध्ये डॉ. चांदेवार हे त्यांच्या केबिनमध्ये मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली.
मानेवाडा येथील शिवशक्ती नगर परिसरातील रहिवासी असलेले डॉ. चांदेवार यांनी आयुर्वेद वैद्यकीय शाखेत शिक्षण घेतले होते. ते संबंधित रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून प्रशासकीय जबाबदाऱ्याही सांभाळत होते. रविवारी रात्रीची ड्युटी पूर्ण केल्यानंतर पहाटे सुमारे ४ वाजता ते आपल्या केबिनमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी एनेस्थेशिया इंजेक्शनचा ओव्हरडोस घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सोमवारी सकाळी कर्मचारी कामावर आल्यानंतर डॉ. चांदेवार केबिनमधून बाहेर न आल्याने त्यांना हाक मारण्यात आली. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला. दरवाजा आतून बंद असल्याने रुग्णालय प्रशासनाने तातडीने धंतोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा उघडला असता डॉ. चांदेवार बेशुद्ध अवस्थेत आढळले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
प्राथमिक तपासात डॉ. चांदेवार हे काही काळापासून मानसिक व कौटुंबिक तणावातून जात असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून ते घरीही गेले नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करीत आहेत. धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवाल व इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या निधनाने परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











