मोरभवन परिसरातून सराईत चोरट्याला बेड्या; ५ गुन्ह्यांची उकल, २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : सिताबर्डी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोरभवन बसस्टॉप परिसरातून एका सराईत आरोपीला अटक करून वाहनचोरीसह पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत चोरीच्या दुचाकी आणि धारदार शस्त्रासह एकूण २ लाख ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरभवन बसस्टॉपच्या मागील बाजूस नॉर्थ अंबाझरी रोडलगत एक संशयित इसम धारदार शस्त्रासह फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार सिताबर्डी पोलिसांनी सापळा रचून इशु रवि सोनटक्के (वय २९ वर्षे), रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी, अमरावती रोड, सिताबर्डी याला ताब्यात घेतले.

आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला. अधिक चौकशीत आरोपीने विविध वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या चार दुचाकी हस्तगत केल्या. या कारवाईमुळे सिताबर्डी पोलीस ठाण्यातील तीन तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची उकल झाली असून आणखी एका चोरीच्या वाहनाचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनिता साहू, पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोंपळघट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास रावत तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. श्याम वारंगे, पोहवा नंदकिशोर वाल्दे, पोशि शत्रुघ्न मुंडे, पोशि प्रशांत भोयर, पोशि चेतन शेंडे, पोशि नैनेश तलवारे यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More