– ‘फेशियल रिकन्स्ट्रक्शन’च्या आधारे चेहरा केला पुनर्निर्मित
– ओळख पटविण्यासाठी धडपड, माहिती देणाऱ्याचे नाव ठेवण्यात येईल गुप्त
– सावनेर पोलिसांची आरोपीच्या शोधासाठी विशेष मोहीम
The Exposer
नागपूर : नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी महिलेची निर्घृण हत्या झाल्याच्या प्रकरणाचा तपास आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरू केला आहे. मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी फेशियल रिकन्स्ट्रक्शन (Facial Reconstruction) या हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून तिचा संभाव्य चेहरा तयार केला असून, नागरिकांना ओळख पटविण्यासाठी ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
हा हत्येचा गुन्हा पोलीस ठाणे सावनेर येथे दाखल असून, या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 27 जून 2026 रोजी मौजा पाटणसावंगी शिवारातील शेतामध्ये सुमारे 65 ते 70 वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. मृतदेहावर जळाल्याच्या तसेच इतर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्याने ही हत्या असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी नोंदविला आहे. या महिलेला आरोपीने निर्जन स्थळी आणले आणि नंतर साडीने झाडाला बांधून ठेवून धारदार शस्त्राने हत्या केली, त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय आहॆ.
मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तिच्या हातावरील गोंदणे, अंगावरील कपडे, दागिने आणि इतर ओळखचिन्हांची माहिती प्रसिद्ध केली आहे. याशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तिचा संभाव्य चेहरा तयार करून नागरिकांसमोर ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी सावनेर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांमधील महिला ओळखीची वाटत असल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास तातडीने पोलीस ठाणे सावनेर अथवा तपास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.
पोलीस प्रशासनाचा विश्वास आहे की, नागरिकांच्या सहकार्यामुळे मृत महिलेची ओळख पटण्यास मदत होईल आणि या खुनामागील आरोपींना लवकरच कायद्याच्या कचाट्यात आणणे शक्य होईल.
‘गंगाबाई’ टॅटूसह वैशिष्ट्यांवरून माहिती देण्याचे आवाहन

सावनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची उंची सुमारे ५ फूट, रंग निमगोरा, शरीरयष्टी सडपातळ असून चेहरा लांब आहे. तिच्या अंगावर जांभळा, निळा, कथ्था व हिरव्या रंगाची साडी, काळपट ब्लाउज, सिल्व्हर रंगाची पायपट्टी, काळ्या मण्यांची माळ, तसेच दोन पदरी बाजारू गोल मण्यांची माळ व दोन लॉकेट आढळून आले आहेत. याशिवाय काळ्या रंगाची गळसरी, शेंदरी रंगाच्या बांगडीचे दोन अर्धवट तुकडे देखील मिळाले आहेत.
महिलेचे केस पांढरे, नाक लांब, डोळे काळे असून दोन्ही कानांच्या वरच्या बाजूला बारीक कटिंग केलेले आहे. विशेष म्हणजे, उजव्या हातावर झाडाचे चित्र, तर डाव्या हातावर मराठीत “गंगाबाई” असे गोंदलेले असून त्यासोबत झाडाचे चित्र देखील आहे. या वैशिष्ट्यांच्या आधारे महिलेची ओळख पटविण्यास पोलिसांना मदत होण्याची अपेक्षा आहे.
या महिलेबाबत कोणाकडेही माहिती असल्यास त्यांनी सावनेर पोलीस ठाणे येथे 07113-232209 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांच्याशी 7722000376 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











