– सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने मानकापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
– गुन्ह्यात वापरलेल्या ५ दुचाकींसह ५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : मानकापूर रिंग रोडवर किरकोळ वाहतूक वादाचे रूप भीषण ‘रोड रेज’मध्ये बदलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आडव्या-तिडव्या पद्धतीने दुचाकी चालवत असलेल्या तरुणांना हॉर्न दिल्याचा राग मनात धरून १२ ते १४ जणांच्या टोळक्याने कारचालकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ, दगडफेक आणि कारची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणात मानकापूर पोलिसांना अवघ्या काही तासांत कारवाई करत १४ आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीनी गुन्ह्यात वापरलेल्या पाच दुचाकीही जप्त केल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना मानकापूर येथील रहिवासी कुणाल मधुसूदन सिंह (वय ३५) हे २८ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जरीपटका येथून कारने घरी जात होते. त्यावेळी ७ ते ८ दुचाकींवर डबल व ट्रिपल सीट प्रवास करणारे काही तरुण भरधाव आणि बेदरकार पद्धतीने दुचाकी वाहने चालवत होते. मार्ग मोकळा करण्यासाठी कुणाल यांनी हॉर्न वाजविल्यानंतर ते पुढे निघून गेले.
मात्र, मानकापूर रिंग रोडवरील मकबूल मशिदीजवळ कार थांबताच मागून आलेल्या टोळक्याने त्यांच्या कारसमोर दुचाकी आडव्या लावून त्यांना घेरले. आरोपींनी शिवीगाळ करत कारवर दगडफेक केली. कारची मागील काच फोडण्यात आली, तर एका दगडाचा फटका कुणाल यांच्या अंगावर बसल्याने ते जखमी झाले.
या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पाचपावली परिसरात सापळा रचून १४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ५ लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त (उत्तर) विनीता साहू, पोलिस उपायुक्त (झोन-२) अन्नपूर्णा सिंह आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (सदर) सत्यवीर बंदीवार यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरेश कालसेकर, ग्रेड पीएसआय सुनील डगवाल, प्रवीण भोयर, अनुप यादव आणि योगेश महाले यांच्या पथकाने केली. आरोपींना बीएनएस कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली असून पुढील प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे.
सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या माहितीने उघडकीस आली टोळी
घटनेनंतर मानकापूर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातील संशयितांचे फोटो आणि व्हिडिओ गोपनीय खबरी नेटवर्ककडे पाठविण्यात आले. त्यातून आरोपी पाचपावली परिसरातील नाईक तलाव, लालगंज आणि खैरीपुरा भागातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून सर्वांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
रिसेप्शनला जाताना उद्भवला वाद
प्राथमिक तपासात आरोपी गोरेवाडा परिसरातील एका रिसेप्शन समारंभाला दुचाकींवरून जात असल्याचे समोर आले आहे. वाटेत कारने ओव्हरटेक केल्याचा आणि हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून त्यांनी कारचालकावर हल्ला केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











