मानकापुरात रक्तरंजित थरार! घराबाहेर झोपलेल्या मजुराची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

– पत्नीसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह, हत्येमागील कारण अद्याप गूढ

The Exposer
नागपूर : मानकापूर परिसरात शनिवारी पहाटे एका बांधकाम मजुराची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घराबाहेर झोपलेल्या मजुरावर अज्ञात व्यक्तीने अचानक जीवघेणा हल्ला चढविला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. मृताचे नाव मोहताबसिंह सोहनलाल चौधरी (वय ४३, रा. एलआयसी कॉलनी, गोधनी रेल्वे) असे आहे. ते मानकापूर येथील जमील सोसायटीमध्ये पत्नी गीता यांच्यासह भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे. ते बांधकाम मिस्त्री म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पती-पत्नीने जेवण केल्यानंतर काही वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर मोहताबसिंह हे घराबाहेरील उघड्या खोलीत झोपले, तर पत्नी घरात झोपल्या. शनिवारी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने कुऱ्हाडीने त्यांच्यावर सपासप वार केले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नी बाहेर धावत आल्या. पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसताच त्यांनी आरडाओरड केली. त्याचवेळी आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला.

आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी मोहताबसिंह यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य किंवा अन्य कोणता हेतू होता का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More