– हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
The Exposer
नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांच्या 104व्या सालाना उर्साच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेबाबत व्यापक तयारी सुरू केली असून, उर्स शांततापूर्ण व सुरळीत पार पडावा यासाठी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टसोबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

यापूर्वी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी ताजबाग दर्गा परिसराची पाहणी करून विविध सुविधांचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता पोलिस विभागाने सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्वतंत्र बैठक घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
बैठकीला दक्षिण विभागाचे अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, उत्तर विभागाच्या अपर पोलिस आयुक्त विनिता साहू, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे जिया खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र जिचकार, विश्वस्त फारूकभाई बावला, हाजी इमरान खान, गजेंद्रपाल सिंह लोहिया, मुस्तफाभाई टोपीवाला, वाहतूक पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर, पोलिस उपायुक्त (झोन-४) रश्मिता राव, सहाय्यक पोलिस आयुक्त रोशन पंडित, सक्करदरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश खुणे, वाहतूक पोलिस निरीक्षक राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उर्सादरम्यान दर्गा परिसरातील सुरक्षा, भाविकांच्या ये-जा व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, आपत्कालीन सेवा आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नियोजित वेळेत सर्व व्यवस्था पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले की, उर्सासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा असून त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, संवेदनशील ठिकाणी विशेष नजर, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र नियोजन तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
प्रशासन, पोलिस विभाग आणि हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे यंदाचा 104वा सालाना उर्स सुरक्षित, शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
Author: संतोष तायडे
संपादक











