गुन्हे शाखा युनिट-५ची धडाकेबाज कारवाई! खुनातील दोन विधिसंघर्षग्रस्त बालके ताब्यात; कटातील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू

– पोलिसांची फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी शोधमोहीम तीव्र

The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक-५ ने भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश बोरकर खुन प्रकरणी आक्रमक कारवाई करत पाहिजे असलेल्या दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या सापळा कारवाईत ही मोठी यशस्वी कामगिरी करण्यात आली असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि इतर फरार आरोपींचा शोधही वेगाने सुरू आहे. दुसऱ्या पत्नीनेच सुपारी देऊन हत्याकांड घडविल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहॆ.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. १६४/२०२६ मध्ये खुनाच्या प्रकरणातील दोन विधिसंघर्षग्रस्त बालके ऑटोमोटिव्ह चौक परिसरात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान या दोघांनी धक्कादायक माहिती उघड केली. या खुनासाठी त्यांना पैशांचे आमिष दाखविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून, या कटात काही आरोपींचा सहभाग असल्याचेही सांगितले आहे. पोलिसांनी या माहितीच्या आधारे मुख्य सूत्रधारांसह फरार आरोपी अमन उर्फ नाटू पप्पू केतवार व अर्जुन (पूर्ण नाव व पत्ता शोधात) यांचा कसून शोध सुरू केला आहे.

यापूर्वी या प्रकरणात पत्नी मनीषा बोरेकर आणि अभिजित साखरे यांना अटक करण्यात आली असून, आता उर्वरित आरोपींना जेरबंद करण्यासाठी गुन्हे शाखेची शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या विधिसंघर्षग्रस्त बालकांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना त्यांच्या पालकांच्या उपस्थित भांडेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दिपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वात सपोनि गणेश कदम, पोउपनि विशाल सांगोळे, पोलीस हवालदार रूपेश नानवटकर, राजेंद्र टाकळीकर, राजू टाकळकर, नजीर शेख, चंद्रशेखर गौतम, गणेश ठाकरे, अनिस खान, राजसिंग राठोड, प्रविण भगत, प्रमोद बावणे, पोलीस अंमलदार रोशन तांडळकर, विशाल नागभिडे, दिपक बावणकर, लिलाधर खिरटकर, चालक पोलीस हवालदार / चालक पोलीस शिपाई अमोल भवते, योगेश महाजन, आशीष पवार, सुधीर तिवारी यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More