– MARVEL कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा नागपूर ग्रामीण पोलिसांचा प्रभावी वापर; सावनेर पोलिसांची शास्त्रशुद्ध तपासाची मोठी कामगिरी
The Exposer
नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित MARVEL (Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अज्ञात महिलेवरील लैंगिक अत्याचार व खून प्रकरणाचा छडा लावत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक तपास आणि बारकाईने केलेल्या डिजिटल विश्लेषणामुळे अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचा हा गुन्हा उघडकीस आला. वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा, सावनेर, केळवद आणि सावखेडा पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.
शेतात आढळले होते अज्ञात महिलेचे शव
२७ जून ते २८ जून २०२६ दरम्यान सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथील एका शेतात अंदाजे ६५ ते ७० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
ओळख नव्हती, पुरावे नव्हते… तरी AI ने दाखवला आरोपीचा माग
या प्रकरणात मृत महिलेची ओळख, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा ठोस प्राथमिक पुरावे उपलब्ध नसल्याने तपास अत्यंत आव्हानात्मक होता. अशा परिस्थितीत पोलिसांनी MARVEL AI चा आधार घेत महिलेच्या विद्रूप झालेल्या चेहऱ्याचे Face Reconstruction केले. पुनर्निर्मित छायाचित्रांच्या आधारे सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांमार्फत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न करण्यात आले.
१८२ CCTV, ५ हजार मोबाईल लोकेशन आणि १५ हजार वाहनांचा डेटा तपासला
तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल १८२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, सुमारे ५ हजार मोबाईल टेलिकॉम डेटा ट्रॅजेक्टरी, १५ हजार वाहनांची माहिती, परिसरातील ८० ते ९० नागरिक व कामगारांची चौकशी, तसेच विविध तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा माग काढला.सीसीटीव्हीतील धूसर फुटेजवर MARVEL AI Photo Enhancement आणि Face & Body Reconstruction तंत्रज्ञानाचा वापर करून संशयिताचे स्पष्ट चित्र तयार करण्यात आले. त्यानंतर आरोपीचा माग नागपूर शहरापर्यंत पोहोचला.
चिप्सच्या पाकिटापासून आरोपीपर्यंत
घटनास्थळी सापडलेल्या चिप्सच्या पाकिटाचा वैज्ञानिक तपास, संबंधित विक्रेत्यांच्या व्यवहारांचे विश्लेषण, ICJC व NATGRID पोर्टलवरील माहिती, तसेच नागपूर, अमरावती आणि मध्यप्रदेशातील विविध जिल्ह्यांतील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी करण्यात आली. समाजसेवकांकडून मिळालेल्या एका महत्त्वाच्या छायाचित्रामुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाली.
आरोपी अटकेत; पूर्वीचे गुन्हेही उघड
या प्रकरणी पोलिसांनी सुधाकर दादाराव मंडपे (वय ४८, रा. बन्साळी टाकळी, ता. सावनेर, जि. नागपूर) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वीही महिलांवरील अत्याचार, विनयभंग तसेच इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर ग्रामीण पोलिसांची तंत्रज्ञानाधारित तपासाची नवी दिशा
या कारवाईमुळे नागपूर ग्रामीण पोलिसांनी आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल फॉरेन्सिक आणि वैज्ञानिक तपास यांच्या प्रभावी समन्वयातून गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. MARVEL AI च्या मदतीने पारंपरिक तपासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणत कायदा अंमलबजावणीत नवा मापदंड निर्माण केला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











