सुगंधित तंबाखू माफियावर नागपूर ग्रामीण पोलिसांचा बुलडोझर’! हरिश चमेडिया ८ महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

– अवैध सुगंधित तंबाखू व्यवसायावर कठोर कारवाई; नागरिकांना आरोपी दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन

The Exposer
नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांनी अवैध सुगंधित तंबाखूच्या व्यवसायात सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा धडाका सुरू ठेवत भिवापूर पोलिस स्टेशन हद्दीतील हरिश राजेश चमेडिया (वय ३५, रा. भिवापूर, जि. नागपूर) याला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) अंतर्गत नागपूर शहर व नागपूर ग्रामीण जिल्ह्यातून तब्बल आठ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हरिश चमेडिया याच्याविरुद्ध अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक व विक्रीसंदर्भात अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी यापूर्वीही पोलिसांनी विविध प्रतिबंधात्मक कारवाया केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही त्याने अवैध कृत्ये सुरूच ठेवल्याने परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यामुळे भिवापूर पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, उमरेड यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी, उमरेड यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची छाननी करून अधिकाऱ्यांनी तो मंजूर करत आरोपीला नागपूर शहर व नागपूर ग्रामीण जिल्ह्यातून आठ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.

नागपूर ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हद्दपार करण्यात आलेला आरोपी नागपूर शहर किंवा नागपूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत आढळल्यास त्याची तात्काळ माहिती जवळच्या पोलिस ठाण्याला द्यावी, जेणेकरून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करता येईल.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More