– आजारी पोलिस कर्मचाऱ्याच्या बहिणीची सदर पोलिस ठाण्यात तक्रार
The Exposer
नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील ब्रेनस्ट्रोक व अर्धांगवायूमुळे गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या असहाय अवस्थेचा गैरफायदा घेत विश्वास संपादन करून त्यांचा प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न, फसवणूक, विश्वासघात, मूळ कागदपत्रांचा अपहार आणि धमकी दिल्याचा गंभीर आरोप करणारी तक्रार सदर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार कु. वनिता लक्ष्मण नगरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे लहान भाऊ अजय लक्ष्मण नगरकर हे 1991 मध्ये नागपूर शहर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून सेवेत रुजू झाले होते. 2013 मध्ये त्यांना प्रथम अर्धांगवायूचा झटका आला. काही प्रमाणात प्रकृती सुधारल्यानंतर ते पुन्हा सेवेत रुजू झाले; मात्र 2019 मध्ये त्यांना पुन्हा गंभीर ब्रेनस्ट्रोक व अर्धांगवायूचा झटका आल्याने ते आजपर्यंत पूर्णपणे अंथरुणाला खिळलेले आहेत. उठून बसने, चालणे, बोलणे, लिहिणे, वाचणे तसेच कोणताही व्यवहार समजून घेणे किंवा स्वतः निर्णय घेणे त्यांना शक्य नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अजय नगरकर यांनी 5 फेब्रुवारी 2009 रोजी मौजा बनवाडी येथील 1000 चौ. फूटाचा भूखंड नोटरी कब्जापत्राद्वारे खरेदी केला होता. सन 2024 मध्ये अनिल नारायण पवार याच्याशी फिर्यादी वनिता नगरकर यांची ओळख झाल्यानंतर त्याने विविध शासकीय कार्यालयांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून संबंधित प्लॉटचे एनएमआरडीएकडून डिमांड व आरएल काढून देण्याचे आमिष दाखविले.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या नावाखाली घरी येऊन कोणतेही दस्तऐवज वाचू न देता तक्रारदाराच्या स्वाक्षऱ्या घेतल्या तसेच वैद्यकीयदृष्ट्या व्यवहार करण्यास असमर्थ असलेल्या अजय नगरकर यांचा अंगठ्याचा ठसा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, संबंधित व्यक्तीने प्लॉटची सर्व मूळ कागदपत्रे स्वतःकडे घेतली. त्यानंतर घरात ₹50 हजारांचा धनादेश आढळून आला. याबाबत वारंवार विचारणा करूनही स्पष्ट उत्तर देण्यात आले नाही. जवळपास दीड वर्ष टाळाटाळ केल्यानंतर प्लॉटच्या मूळ कागदपत्रांऐवजी केवळ झेरॉक्स प्रती देण्यात आल्या. त्या तपासल्यानंतर ₹100 च्या स्टॅम्प पेपरवर प्लॉटचा कथित विक्री करारनामा तयार करण्यात आल्याचे, त्यात ₹70 हजार मोबदल्याचा उल्लेख असून 20 हजार रुपये रोख स्वरूपात नगदी दिल्याचे म्हटले आहॆ. तसेच तक्रारदाराची स्वाक्षरी आणि अजय नगरकर यांचा अंगठ्याचा ठसा घेण्यात आल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारदाराचा आरोप आहे की, संपूर्ण व्यवहार हा दिशाभूल करून, विश्वासाचा गैरफायदा घेत तसेच आजारी पोलीस कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय अवस्थेचा फायदा उठवून करण्यात आला. मूळ कागदपत्रे परत मागितल्यावर धमकी देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कारण कुठलाही व्यवहार झाला नसतांना आजारी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मालकीच्या प्लॉटचे मूळ दास्तादेवज गैर अर्जदाराने दिशाभूल करून घेऊन जावून अपहार करणे कितपत योग्य आहॆ. असा सवाल यनिमित्ताने तक्रारदार वनिता नगरकर यांनी उपस्थित केला आहॆ.
तक्रारदार व त्यांचे भाऊ हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधिताविरुद्ध लागू असलेल्या भारतीय न्याय संहिता (BNS) व इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंद करावा, प्लॉटची सर्व मूळ कागदपत्रे जप्त करून परत मिळवून द्यावीत, आजारी पोलीस कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय स्थितीची तपासात नोंद घेऊन दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी सदर पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहॆ.
Author: संतोष तायडे
संपादक











