गांधीसागर तलावाजवळ देशी कट्ट्यासह आरोपी जेरबंद

– क्राइम ब्रँचच्या सामाजिक सुरक्षा विभागाची धडक कारवाई

The Exposer
नागपूर : शहरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास आवळत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली. गांधीसागर तलाव परिसरातून मोहम्मद सोहेल नामक आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गांधीसागर तलाव परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असून त्याच्याजवळ अवैध शस्त्र असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी अवैध शस्त्र व काडतुसे जप्त करून मोहम्मद सोहेल याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले. आरोपीने हे शस्त्र कुठून आणि कोणाकडून मिळविले, तो शस्त्र घेऊन गांधीसागर तलाव परिसरात कोणत्या उद्देशाने फिरत होता तसेच या प्रकरणामागे अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, या दिशेने तपास करण्यात येत आहे.

या कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्रांची खरेदी-विक्री आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी असलेल्या संभाव्य संबंधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपीविरुद्ध संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More