‘कोट्यवधींच्या नफ्याचे’ आमिष; डॉक्टरला ४६.१६ लाखांचा सायबर गंडा

– व्हॉट्सऍप ग्रुप, बनावट ‘SEBI’ प्रमाणपत्र आणि १६.५२ कोटींच्या खोट्या नफ्याचे दाखवले स्वप्न

The Exposer
नागपूर : शेअर मार्केटमधून अल्पावधीत कोट्यवधींचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी एका डॉक्टरची तब्बल ४६ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यूट्यूबवरील जाहिरातीपासून सुरू झालेला हा प्रवास व्हॉट्सऍप गुंतवणूक ग्रुप, बनावट ‘SEBI’ नोंदणी आणि खोट्या नफ्याच्या आकड्यांपर्यंत पोहोचला. अखेर पैसे काढण्यासाठी १६ लाख रुपयांच्या प्रोसेसिंग शुल्काची मागणी होताच हा सायबर कट उघड झाला.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉ. मेश्राम हे एका वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असून गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करीत आहेत. मे २०२६ मध्ये यूट्यूबवर त्यांना मोठ्या परताव्याचे आश्वासन देणारी जाहिरात दिसली. त्यानंतर हेमंत ओसवाल नाव सांगणाऱ्या व्यक्तीने व्हॉट्सऍपवर संपर्क साधून स्वतःला एका इक्विटी ब्रोकिंग कंपनीचा प्रतिनिधी म्हणून ओळख करून दिली आणि डॉक्टरांना एका गुंतवणूक ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले.

त्या ग्रुपमध्ये निश्चिल जैन नावाची व्यक्ती नियमितपणे शेअर खरेदी-विक्रीचे सल्ले देत होती. कथित SEBI नोंदणीचे प्रमाणपत्र दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये नफा झाल्याचे दाखविल्यानंतर आरोपींनी डॉक्टरांना अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्या सांगण्यावरून विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ४६.१६ लाख रुपये जमा करण्यात आले.

यानंतर डॉक्टरांच्या खात्यात १६.५२ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र, ही रक्कम काढण्यासाठी १६ लाख रुपयांचे प्रोसेसिंग शुल्क भरण्याची अट घालण्यात आली. स्वतःचेच पैसे मिळवण्यासाठी अतिरिक्त रक्कम मागितली जात असल्याने डॉक्टरांना संशय आला. त्यांनी एकही रुपया न भरता थेट सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यामुळे आणखी १६ लाख रुपयांची संभाव्य फसवणूक टळली.

या प्रकरणी सायबर पोलिसांनी हेमंत ओसवाल, निश्चिल जैन, सुभी अग्रवाल, संबंधित कथित इक्विटी ब्रोकिंग कंपनीचे व्यवस्थापन आणि व्हॉट्सऍप गुंतवणूक ग्रुपच्या संचालकांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे.

सायबर पोलिसांचा इशारा

सोशल मीडिया, यूट्यूब किंवा मेसेजिंग ऍप्सवरून अल्पावधीत प्रचंड नफा मिळवून देण्याचे दावे करणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था, तिची अधिकृत नोंदणी आणि परवानग्यांची खातरजमा करावी. संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More