– एकाच पथदिव्यावर वाहतुकीचा भार; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका, नागरिकांमध्ये संताप
The Exposer
नागपूर : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा आणि अत्यंत महत्त्वाचा मेडिकल चौक गेल्या काही दिवसांपासून रात्री अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. चौकात केवळ एकच पथदिवा सुरू असून इतर सर्व पथदिवे बंद असल्याने संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे वाहनचालक, पादचारी, रुग्णवाहिका तसेच रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून गंभीर अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
मेडिकल चौकातून दिवसरात्र हजारो वाहने आणि नागरिकांची ये-जा असते. शहरातील प्रमुख रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि महत्त्वाचे रस्ते या चौकाला जोडलेले आहेत. मात्र, अशा महत्त्वाच्या चौकात केवळ एका पथदिव्याच्या प्रकाशावर संपूर्ण वाहतूक सुरू असल्याने अनेक ठिकाणी अंधार पसरला आहे. परिणामी वाहतूक कोंडी, अपघात आणि गुन्हेगारी घटनांचा धोका वाढल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, मेडिकल चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी वेळोवेळी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. विविध विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली मोठा निधी खर्च झाला. मात्र प्रत्यक्षात पथदिवेच बंद असल्याने त्या खर्चाचा उपयोग नेमका कशासाठी झाला, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. विकासकामांच्या कंत्राटांतून कंत्राटदार मालामाल होत असताना, मूलभूत प्रकाशव्यवस्थेकडे महापालिका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्व बंद पथदिवे दुरुस्त करून चौकातील प्रकाशव्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











