– २४ तास पोलिसांना चकवा दिल्यानंतर अखेर अट्टल घरफोड्या ताब्यात
– शहर पोलीस, गुन्हे शाखा, हुडकेश्वर व तिरोडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईला यश
The Exposer
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यातून धाडसी पद्धतीने फरार झालेला अट्टल घरफोड्या इक्का उर्फ हर्ष महेंद्र रामटेके (रा. तिरोडा, जि. गोंदिया) याला अखेर पोलिसांनी तिरोडा येथून जेरबंद केले. तब्बल २४ तास पोलिसांना चकवा देत फरार असलेल्या इक्काचा तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे माग काढत पोलिसांनी त्याला अटक केली. या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलाने सुटकेचा निःश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मानेवाडा स्मशानभूमीतील पवन सूर्यवंशी हत्याकांडातील सात आरोपींसह इक्कालाही हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी एका आरोपीला शौचालयात नेण्यात आले असताना इक्कानेही शौचालयात जाण्याची मागणी केली. लॉकअप गार्ड त्याला बाहेरील शौचालयात घेऊन गेला असता, संधी साधून त्याने गार्डची नजर चुकवली आणि क्षणार्धात तेथून पलायन केले.
आरोपी फरार झाल्याचे समजताच पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली. शहरातील विविध पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि विशेष पथकांना आरोपीच्या शोधासाठी पाचारण करण्यात आले. शहरासह जिल्हाभर नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू करण्यात आली.
विशेष म्हणजे, पोलिसांच्या ताब्यातून पसार होण्याची ही इक्काची पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही त्याने मेडिकल रुग्णालयातून पोलिसांना चकवा देत पलायन केले होते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि आरोपीला पुन्हा अटक करणे हे पोलिसांसाठी प्रतिष्ठेचे आव्हान बनले होते.
दरम्यान, शहर पोलीस, गुन्हे शाखा आणि हुडकेश्वर पोलिसांनी तांत्रिक तपास यंत्रणेचा प्रभावी वापर करत आरोपीच्या हालचालींचा माग काढला. तिरोडा पोलिसांच्या सहकार्याने विशेष पथकाने तिरोडा येथे सापळा रचून इक्काला ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र, यासंदर्भात पोलिस विभागाकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

Author: संतोष तायडे
संपादक











