– नागपूर वाहतूक पोलिस व एनडीआरएफ अकॅडमीचा अनोखा उपक्रम
– दरमहा ४० स्वयंसेवकांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्याचा निर्णय
The Exposer
नागपूर : रस्ता अपघातातील जखमींना “गोल्डन अवर”मध्ये तातडीची आणि प्रभावी वैद्यकीय मदत मिळावी, तसेच अपघातांमधील मृत्यूदर कमी व्हावा या उद्देशाने नागपूर शहर वाहतूक पोलिस आणि एनडीआरएफ अकॅडमी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता अपघात स्वयंसेवकांसाठी दोन दिवसीय बेसिक लाईफ सपोर्ट (BLS) प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रशिक्षणात स्वयंसेवकांना सीपीआर (CPR), रक्तस्त्राव नियंत्रण, फ्रॅक्चर झालेल्या जखमींची सुरक्षित हाताळणी, जखमींची सुरक्षित वाहतूक, आपत्कालीन प्रथमोपचार तसेच अपघातानंतर तातडीने करावयाच्या जीवदायी उपाययोजनांचे सखोल प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देण्यात आली.
प्रशिक्षणाला स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहभागी स्वयंसेवकांनी प्रशिक्षणाची गुणवत्ता, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित अध्यापन पद्धती आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक केले. सहभागींचा वाढता उत्साह लक्षात घेऊन एनडीआरएफ अकॅडमीने दर महिन्याला ४० स्वयंसेवकांच्या एका तुकडीसाठी नियमित बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण आयोजित करण्यास तत्त्वतः सहमती दर्शविली आहे. तसेच नागपूर शहर वाहतूक पोलिसांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही लहान गटांमध्ये सखोल व प्रात्यक्षिकाधारित आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रशिक्षण आयोजित करण्यास अकॅडमीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
प्रशिक्षणाच्या समारोपावेळी सर्व स्वयंसेवकांना प्रथमोपचार साहित्य (First Aid Kit) वितरित करण्यात आले, जेणेकरून प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत ते अधिक प्रभावीपणे मदत करू शकतील. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनडीआरएफ अकॅडमीचे संचालक ब्रिगेडियर सत्यनारायण, श्री गुरिंदर सिंह आणि श्री दिलीप कुमार यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांचे आभार मानले.
रस्ता अपघातग्रस्तांना “गोल्डन अवर”मध्ये तातडीची जीवदायी मदत उपलब्ध करून देणे, अपघाती मृत्यूदर कमी करणे आणि नागरिकांचा आपत्कालीन प्रतिसादामध्ये सक्रिय सहभाग वाढविणे या उद्दिष्टांच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला.
Author: संतोष तायडे
संपादक











