एक शहर… दोन नियम?; मोमीनपुरात मध्यरात्रीनंतरही हॉटेल्स सुरू?

– संपूर्ण शहरात रात्री ११ वाजता शटर डाउन; मात्र मोमीनपुरात शटरबंद हॉटेल्समध्ये सुरूच सेवा?

The Exposer
नागपूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्री १०.३० ते ११ वाजेपर्यंत बंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार शहरातील हॉटेल्स, भोजनालये, सावजी, बिर्याणी सेंटरसह इतर सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने वेळेत बंद होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी अनेक हॉटेल्स पहाटेपर्यंत सुरू राहत होती. मात्र, तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोमीनपुरा परिसरातील काही हॉटेल्स आजही रात्री १२.३० ते १ वाजेपर्यंत सुरू राहत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बाहेरून शटर बंद असल्याचा आभास निर्माण केला जातो; मात्र आतमध्ये ग्राहकांना सेवा सुरूच असल्याचा आरोप केला जात आहे. हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या दुचाक्यांवरूनही या चर्चेला अधिक बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे.

यामुळे “संपूर्ण शहरासाठी एक नियम आणि मोमीनपुरासाठी दुसरा नियम का?” असा संतप्त सवाल व्यावसायिक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील इतर व्यावसायिकांनी पोलिसांच्या आदेशाचे पालन करून आर्थिक फटका सहन केला असताना, काही ठिकाणी नियमांचे कथित उल्लंघन होत असेल तर त्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याशिवाय, रात्री उशिरापर्यंत जेवण सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची या परिसरात वर्दळ वाढत असल्याचीही चर्चा स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.

मोमीनपुरातील या कथित प्रकारामागे नेमका कोणाचा आशीर्वाद आहे? “वसुलीभाई”च्या शहावर हा सावळा गोंधळ सुरू आहे का? अशा स्वरूपाची चर्चा शहरात रंगू लागली आहे. या चर्चेत तथ्य आहे की नाही, याचा छडा घेऊन संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More