शिरसपेठेत गुन्हे शाखेच्या युनिट-४चा धडाकेबाज छापा!

– 70 ग्रॅम एमडीसह दोन ताब्यात, 8.72 लाखांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 4 ने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसपेठ परिसरात छापा टाकून 70.110 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केले. या कारवाईत एका 22 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणात एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अजय यादव यांच्या फिर्यादीवरून इमामवाडा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 286/2026 अंतर्गत एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(ब) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लक्की रामदास मनपिया (वय 22, रा. सिरसपेठ, स्लीपर कॉलनी, हनुमान मंदिराजवळ) असे आहे. तर या गुन्ह्यातील बॉबी मलिक (रा. महाल, कोतवाली) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलीसांनी आरोपींची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडून 70.110 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) किंमत 7.01 लाख रुपये, तीन मोबाईल फोन (95 हजार रुपये), सुजुकी ॲक्सेस दुचाकी (70 हजार रुपये) तसेच 6 हजार रुपये रोख असा एकूण 8 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईनंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्याला मुद्देमालासह इमामवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूराव राऊत, एपीआय बारंगे, हवालदार अजय यादव, अतुल चाटे, देवेंद्र नवघरे, निलेश ढोणे, नजीर, राजपल्लीवर, महेश कटोले, भगवती ठाकूर यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More