एमडीच्या काळ्या साम्राज्यावर पोलिसांचा घणाघात; 17.30 लाखांचा मुद्देमाल जप्त!

 – गोरेवाडा रिंगरोडवर धडक कारवाई; दोन आरोपी जेरबंद
– रेकॉर्डवरील आरोपी फरार; अमली पदार्थांच्या रॅकेटचा तपास वेगात

The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आणखी एक मोठा दणका देत गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई केली. गोरेवाडा रिंगरोडवरील स्वागत नगर परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत 21 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) सदृश्य अमली पदार्थ, स्कॉर्पिओ वाहन आणि मोबाईल फोनसह तब्बल 17 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एनडीपीएस कायद्यातील रेकॉर्डवरील एक आरोपी फरार असल्याने त्याचा कसून शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्ट रोजी पहाटे 2.30 ते 4.20 वाजण्याच्या दरम्यान गोरेवाडा रिंगरोडवरील स्वागत नगर येथील स्टार मोटर्स मल्टी कार वर्कशॉपसमोरील रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान आरोपींकडून 2 लाख 10 हजार रुपये किमतीची 21 ग्रॅम एमडी सदृश्य पावडर, अंदाजे 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि 15 लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ असा एकूण 17 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात दानिश खान अबरार खान (वय 42, जाफरनगर) आणि मुकर्रम मुनावर अली काझी (वय 32, स्वागत नगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या गुन्ह्यातील सय्यद इरफान अली (अंदाजे वय 34, मोमीनपुरा) हा फरार असून, तो यापूर्वीही एनडीपीएस कायद्यांतर्गत रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून, या प्रकरणामागील संपूर्ण अमली पदार्थांच्या नेटवर्कचा तपास सुरू आहे.

या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(ब) व 29 अन्वये गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More