– आता पोलिस वाहनांचे सारथ्यही करणार होमगार्ड; मानधनवाढीसोबत रोजगाराची नवी संधी
The Exposer
नागपूर : राज्यातील होमगार्डसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्याबरोबरच होमगार्डना अधिक व्यापक जबाबदारी आणि रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने आता प्रशिक्षित होमगार्डची पोलिस वाहनांचे चालक म्हणूनही सेवा घेण्यात येणार आहे.
नागपूर शहर पोलिस तसेच वाहतूक पोलिस विभागात सध्या मोठ्या संख्येने होमगार्डची सेवा घेतली जात आहे. गस्त, बंदोबस्त, वाहतूक नियमन आणि विविध पोलिस कामांमध्ये होमगार्ड महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आता वाहनचालक म्हणूनही त्यांना संधी मिळणार असल्याने नागपूरमधील होमगार्डना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यभरातील १,१५० होमगार्डना पहिल्या टप्प्यात पोलिस वाहनचालक म्हणून संधी दिली जाणार आहे. संबंधित होमगार्डना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण करून कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर त्यांना नियमानुसार वाहनचालक म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे पोलिस विभागाला गस्त, बंदोबस्त आणि तपासाच्या कामांसाठी मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर होमगार्डना कौशल्यावर आधारित अतिरिक्त रोजगाराची संधी मिळणार असल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीलाही हातभार लागणार आहे.
होमगार्डच्या मानधनात यापूर्वी करण्यात आलेल्या वाढीमुळेही त्यांच्या उत्पन्नाला आधार मिळाला आहे. आता वाहनचालक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाल्याने मानधनासोबत कौशल्याधारित रोजगाराचा नवा मार्ग खुला झाला आहे.
विशेषतः नागपूरसारख्या मोठ्या शहरात पोलिस आणि वाहतूक विभागावर वाढता कामाचा ताण लक्षात घेता, प्रशिक्षित होमगार्डची वाहनचालक म्हणून नियुक्ती ही पोलिस यंत्रणेसाठीही फायदेशीर ठरणार आहे. होमगार्डना केवळ बंदोबस्तापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या कौशल्याचा पोलिस व्यवस्थेत अधिक व्यापक वापर करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















