अहिल्यानगर येथील पारधी समाजाच्या समाजसेविका सुमन काळे ‘कस्टडी डेथ’ प्रकरणाचा SITकडे तपास!

– १५ वर्षांनंतर राज्य पोलिस महासंचालक कार्यालयाचा मोठा निर्णय; तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश

The Exposer
अहिल्यानगर : पारधी समाजाच्या समाजसेविका सुमन काळे यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू/खून प्रकरणाला तब्बल १५ वर्षांनंतर नव्या तपासाची दिशा मिळाली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने दाखल गुन्हा तसेच सुमन काळे यांच्या मृत्यूसंदर्भातील सर्व अर्ज-प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती, हे विशेष.

यासंदर्भातील आदेश १३ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. राज्य पोलिस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक (गुन्हे-पश्चिम), सुधीर हिरेमठ यांची विशेष तपास पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तपास पथक प्रमुखांच्या गरजेनुसार संबंधित पोलिस अधिकारी व अंमलदारांचा पथकात समावेश करण्यात येणार आहे.या विशेष तपास पथकावर देखरेख ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील महामार्ग सुरक्षा विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. SIT ने तीन महिन्यांच्या आत संबंधित गुन्ह्याचा तपास तसेच सुमन काळे यांच्या मृत्यूसंदर्भातील सर्व अर्ज-प्रकरणांची चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयोगाच्या दखलीनंतर प्रकरणाला वेग

सुमन काळे प्रकरणाबाबत विवेक विचार मंचाचे राज्य सहसंयोजक प्रा. सागर शिंदे यांनी अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार करून सातत्याने पाठपुरावा केला होता. आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी २३ मार्च २०२५ रोजी अहिल्यानगर येथे प्रत्यक्ष भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

विधानसभेतही उठला होता आवाज

या प्रकरणाला विधानसभेतही आवाज मिळाला. श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सुमन काळे यांच्या मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासनस्तरावर या प्रकरणाची दखल घेण्यात आली आणि अखेर विशेष तपास पथकाच्या माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय झाला.

१५ वर्षांनंतर सत्य समोर येणार?

सन २००७ मध्ये घडलेल्या सुमन काळे यांच्या पोलिस कोठडीतील संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास आता स्वतंत्र विशेष तपास पथकाकडे सोपविण्यात आल्याने या प्रकरणातील अनेक अनुत्तरित प्रश्नांना पुन्हा उजाळा मिळाला आहे.

SIT च्या तपासातून नेमके काय घडले, जबाबदारी कोणाची होती आणि प्रकरणातील वस्तुस्थिती काय आहे, याचा उलगडा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दीर्घकाळ न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमन काळे यांच्या कुटुंबीयांसाठी ही कार्यवाही महत्त्वाची मानली जात आहे. आता तीन महिन्यांत SIT काय निष्कर्ष काढते, याकडे अहिल्यानगरसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More